Sister Killed Brother Crime News: पालकांनी मुलं कळती होईपर्यंत त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. पालकांकडून जर प्रेम, आपुलकी मिळाली नाही तर अनेकदा मुलांवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातही जर दोन मुलं असतील तर अनेकदा त्यांच्यात दुजाभाव केला जात असल्याची भावना असते. ही भावना निर्माण होऊ नये यासाठी दोघांनाही समान प्रेम, आपुलकी मिळावी हे पाहणं पालकांची जबाबदारी असते. तिकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं हे एका घटनेमुळे समोर आलं आहे. त्यामुळे पालकांनी सावध होण्याची गरज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणाच्या (Haryana) फरिदाबाद येथे अल्पवयीन मुलीने आपल्याच छोट्या भावाची गळा दाबून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. फरीदाबादच्या बल्लभगड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 15 वर्षीय बहिणीने आपल्याच 12 वर्षाच्या भावाची गळा दाबून हत्या केल्याने परिसरात सगळेचजण चक्रावले आहेत. पण या हत्येचं कारण समोर आलं तेव्हा पालकांसह पोलीसही हादरले. याचं कारण मुलीला आपले आई-वडील आपल्यापेक्षा भावावर जास्त प्रेम करतात असं वाटत होतं. याचमुळे तिने आपल्या छोट्या भावाला गळा दाबून ठार केलं. पोलीस याप्रकरणी नातेवाईकांच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीची चौकशी करत आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, बल्लभगढ येथे 12 वर्षाच्या मुलाची घरातच गळा दाबून हत्या करण्यात आली. मुलाच्या आईने सांगितलं आहे की, मी आणि माझा पती दोघेही नोकरी करतो. मंगळवारी संध्याकाळी जेव्हा घरी आलो तेव्हा मुलगा अंगावर चादर घेऊन झोपला होता. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठत नव्हता. नंतर चादर बाजूला करुन पाहिलं तर आम्हाला धक्काच बसला. कारण त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी घरात फक्त तो आणि त्याची मोठी बहिण होती. 


घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरु केला. पोलिसांना मुलाच्या 15 वर्षीय बहिणीवर संशय आला. त्यांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत तिची चौकशी केली. यावेळी जे समोर आलं ते ऐकून नातेवाईकांसह, आई-वडील आणि पोलीसही हादरले. 


मुलीला आई-वडील भावावर जास्त प्रेम करत असल्याचं वाटत होतं


अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितलं की, तो आणि तिचा भाऊ उत्तर प्रदेशात आपल्या आजी-आजोबांकडे राहतात. तिथेच ते शाळेत जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आम्ही आई-वडिलांकडे आलो होतो. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीला आई-वडील आपल्या भावावर जास्त प्रेम करतात असं तिला वाटत होते. 


नातेवाईकांनी मुलीला मोबाइल दिला होता. मंगळवारी तिचा भाऊ मोबाइलवर गेम खेळत होता. तेव्हाच मुलीने मोबाइल मागितला. भावाने मोबाइल देण्यास नकार दिला असता तिने रागात भावाची गळा दाबून हत्या केली. यानंतर पोलीस मुलीला बाल न्याय मंडळात हजर करणार आहेत. मृत मुलाच्या आईच्या माहितीनुसार, हत्या झाली तेव्हा फक्त मुलगीच घरात होती. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.