बिहारमध्ये नर्सनेच डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. समस्तीपूरमधील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डॉक्टर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना नर्सने सर्जिकल ब्लेडने गुप्तांगावर हल्ला केला. याप्रकरणी आरोपी डॉक्टर संजय कुमार संजूला अटक करण्यात आली आहे. इतर दोन्ही आरोपींची ओळखही पटली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेगुसराय जिल्ह्यातील डॉ संजय कुमार संजू, वैशाली जिल्ह्यातील सुनील कुमार गुप्ता आणि मंगरा भागातील अवधेश कुमार अशी आरोपींची नावे आहेत. रिपोर्ट्सनुसार, आरोपी डॉक्टरने आपल्या सहकाऱ्यांसह मद्यप्राशन केलं होतं. याच अवस्थेत त्यांनी नर्सला त्रास देण्यास सुरुवात केली. नर्स आरोग्य केंद्रात कर्तव्यावर होती. संजय कुमार संजू याने जेव्हा नर्सचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिस्थिती बिघडली. यावेळी नर्सने स्वत:चा बचाव करताना सर्जिकल ब्लेड उचललं आणि त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला. यामुळे संजूची पकड सुटली आणि याचा फायदा घेत तिने तेथून पळ काढला. 


सुनील आणि अवधेश यांनी नर्सचा पाठलाग करत तिला पकडण्याचा प्रयत्न केला. पण नर्सने आपली सुटका करुन घेतली आणि 112 क्रमांकावरुन पोलिसांशी संपर्क साधला. फोन येताच पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांच्या नेतृत्वातील पथकाने धाड टाकून आरोपी डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी घटनास्थळावरुन रक्ताने माखलेले कपडे मिळवले आहेत. 


जखमी डॉक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत. त्याच्या आरोग्याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. आरोपी डॉक्टर सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलीस सध्या अतिरिक्त माहिती आणि पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 


डीएसपी संजय कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने रात्री उशिरा आपातकालीन क्रमांकावर संपर्क साधला. यानंतर स्थानिक पोलिसांना कळवण्यात आलं होतं. पोलीस अधिक्षकांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळ गाठलं. पीडित जवळच्याच एका शेतात लपलेली होती. तिने पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला. 


गेल्या 10 ते 15 महिन्यांपासून रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सने डॉक्टर, एक फिजिओथेरपिस्ट आणि त्याचे दोन सहकारी तिला त्रास देण्याआधी मद्यपान करत असल्याचे सांगितले. डॉक्टरला रोखण्यासाठी तिला संघर्ष करावा लागत होता. स्वसंरक्षणाच्या कृतीत, तिने डॉक्टरांवर हल्ला करण्यासाठी सर्जिकल ब्लेडचा वापर केला ज्यामुळे तिला पळून जाण्याची आणि मदतीसाठी कॉल करण्याची संधी मिळाली. 


तपासकर्त्यांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेल्या बेडशीट, तीन मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्यांसह अनेक पुरावे जप्त केले आहेत. गुन्हा घडण्यापूर्वी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.