मथुरामधील राया पोलीस ठाणे क्षेत्रातील अयेराजवळ पोलिसांना एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. 4 मे रोजी पोलसांना एका पेटीत हा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी वेगवान कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येत पीडित व्यक्तीचा मुलगाच सहभागी आहे. वडिलांनी समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने त्याने मित्रांच्या मदतीने वडिलांना ठार केलं. हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह घरात लपवला होता. पण नंतर 3 मेच्या रात्री मृतदेह पेटीत टाकून त्याला आग लावली. अटकेदरम्यान झालेल्या चकमकीत आरोपींपैकी दोघे जखमी झाले आहेत. चारही आरोपींची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस अधिक्षक देहात त्रिगुण बिसेन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, पी़डित व्यक्तीची ओळख मोहनलाल शर्मा अशी पटली आहे. चौकशीदरम्यान मोहनलाल यांच्या 23 वर्षीय मुलगा अजितचे कृष्णाशी समलैंगिक संबपंध होते असं उघड झालं. कृष्णाच्या माध्यमातून त्याची राकेश आणि दीपक यांच्याशी ओळख झाली होती. मोहनलाल यांनी मुलाच्या समलैंगिक संबंधांचा विरोध केला होता. 


मोहनलाल यांनी याच विरोधातून कृष्णा आणि अजित यांच्या कानाखाली लगावली होती. यानंतर राकेश आणि दीपक यांच्या मदतीने मोहनलाल यांची हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर एका दिवसासाठी मृतदेह घऱातच ठेवण्यात आला होता. यानंतर 3 मेच्या रात्री त्यांनी मृतदेह एका पेटीत टाकला आणि बाईकवरुन रायाला घेऊन आला. तिथे त्यांनी मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावली, 


मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता, मुलानेच मित्रांच्या मदतीने हत्या केल्याचं उघड झालं. यानंतर पोलिसांनी राकेश आणि दीपक यांना रविवारी यमुनापूलच्या खाली असणाऱ्या स्मशान घाटावरुन अटक केली. त्यांची चौकशी केली असता कृष्णा आणि अजित हाथरस येथे पळून गेल्याचं उघड झालं. ते रविवारी रात्री परत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


पोलिसांनी कृष्णा आणि अजितला पकडण्यासाठी हाथरस रोडवर चेकिंग सुरु केली होती. रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी आरोपी तिथे पोहोचले असता त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कृष्णा आणि अजित यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिसांनी गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं असता दोघांच्या पायात गोळी लागली. पोलिसांनी त्या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.