Crime News: चोरी करताना अक्कल वापरलं नाही तर काय होतं हे दर्शवणारी एक घटना नुकतीच घडली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत ही अजब घटना घडली आहे. चोरी करण्यासाठी घरात घुसखोरी केलेल्या चोराने चोरी केल्यानंतर त्याच घरात बसून दारु प्यायला सुरुवात केली. तो इतकी दारु प्यायला की तिथेच बेडरुममध्ये झोपी गेला. घरातील लोक लग्नासाठी बाहेर गेले होते. घरी येऊन त्यांनी पाहिलं तर एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या बेडरुममध्ये झोपला होता. यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात दिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या छपराचे निवासी असणारे शरवानंद हे लष्करातून नायक सुबेदार पदावर निवृत्त झाले आहेत. लखनऊमध्ये ते आपल्या कुटुंबात राहतात. एका लग्नासाठी ते सर्वजण बाहेर गेले होते. पण घरी य़ेऊन पाहिलं तर दारुच्या बाटल्या पडल्या होत्या. सर्व सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं. यानंतर ते बेडरुममध्ये पोहोचले तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण येथे एक व्यक्ती चक्क त्यांच्या बेडवर झोपलेला होता. 


कुटुंबाने संपूर्ण घराची नीट झडती घेतली असता 8 लाखांहून अधिक किंमतीचं सामान चोरी गेलं असल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं असता तपासात त्यांच नाव सलीन असून, शारदा नगरचा रहिवासी असल्याचं उघड झालं. आपल्यासह आणखी एक सहकारी होता. त्याने चोरी केल्यानंतर दारु पाजून आपल्याला मागे सोडलं असा दावा त्याने केला आहे. 


"लग्नातून घरी आल्यानंतर मी दरवाजा उघडला होता. यावेळी गेटच्या वरील भाग तोडला असल्याचं माझ्या लक्षात आलं. घरात सगळं सामान खाली पडलेलं होतं. मी बेडरुममध्ये पोहोचलो तर एक तरुण आरामशीर झोपलेला होता. त्याच्या बाजूला दारुच्या बाटल्या पडलेल्या होत्या," अशी माहिती शरवानंद यांनी दिली आहे. 


कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, घरातून 100 ग्रॅम सोनं, 1.5 लाख किंमतीचं 2 किलो चांदीचं सामान, 50 हजारांच्या 40 साड्या आणि 6 लाख रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. 


शरवानंद यांच्या कुटुंबाने चोर उठवण्याची वेळ पाहिली आणि उठल्यानंतर लगेच पोलिसांच्या ताब्यात दिलं. चौकशीत त्याने सांगितलं की, आपलं नाव सलीम असून आपल्या एका सहकाऱ्यासोबत घरात चोरी करण्यासाठी शिरलो होतो. 


सलीमच्या माहितीनुसार, घरात घुसल्यानंतर आम्ही किंमती सामना शोधत होतो. घऱातील सामान जमा केल्यानंतर सहकाऱ्याने तिथे असणारी दारु आपल्याला प्यायला लावली. दारु प्यायल्यानंतर सलीमची शुद्ध हरपली होती. यावेळी तो बेडरुममध्ये होता. ही संधी साधत त्याच्या सहकाऱ्याने लुटलेल्या सर्व सामानासह पळ काढला. पोलीस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. सलीमने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या सहकाऱ्याचा शोध घेतला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.