जोधपूर : भारतात एक रेल्वे स्टेशन असे आहे जे भारतीय रेल्वेद्वारा नाही तर गावकरी मिळून चालवतात. गेल्या 15 वर्षांपासून हे स्थानक ग्रामस्थ चालवत असून येथील तिकीट कलेक्टरही गावातीलच व्यक्ती आहे. एकेकाळी हे रेल्वे स्थानक तोट्यामुळे बंद करण्यात येणार होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2005 मध्ये जलसू नानक हॉल्ट स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला


एका धोरणानुसार, रेल्वेला जोधपूर रेल्वे विभागातील अशी रेल्वे स्थानके बंद करावी लागली जिथे उत्पन्न कमी होत होते. अशा परिस्थितीत 2005 मध्ये रेल्वेने जलसू नानक हॉल्ट स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला. येथील ग्रामस्थांना हे मान्य नव्हते. या निर्णयाला विरोध करत ते धरणे धरून बसले.


या ग्रामस्थांचे हे धरणे 11 दिवस चालले. रेल्वेने गावकऱ्यांची आज्ञा पाळली पण सोबत एक अट घातली. हे स्थानक बंद केले जाणार नसून रेल्वे त्याची कोणतीही जबाबदारी घेणार नसल्याचे रेल्वेने सांगितले. अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी स्वत:च्या जबाबदारीवर हे स्थानक चालवायला घेतले. ग्रामस्थांना येथून दररोज 50 तिकिटांची आणि महिन्याला 1500 तिकिटांची विक्री करावी, अशी अटही रेल्वेने ठेवली होती.


हे स्टेशन चालवण्यासाठी गावातील प्रत्येक घरातून ग्रामस्थांनी देणग्या गोळा केल्या.
आपले स्टेशन वाचवण्यासाठी गावकरी काहीही करायला तयार होते. अशा स्थितीत त्यांनी रेल्वेची ही अट मान्य करून स्वत:च्या जबाबदारीवर हे स्थानक चालवण्यास सुरुवात केली. हे स्टेशन चालवण्यासाठी गावकऱ्यांनी गावातील प्रत्येक घरातून देणग्या गोळा केल्या. यानंतर 1500 तिकिटे देखील दीड लाख रुपयांना खरेदी करण्यात आली आणि उर्वरित रुपये व्याज म्हणून गुंतवले. तिकीट विकण्यासाठी गावकऱ्यांनी एका गावकऱ्याला 5000 रुपये पगारावर तिकीट कलेक्टरच्या कामावर ठेवले.


दरमहा रेल्वेला 30 हजारांहून अधिक उत्पन्न


सुरुवातीला गावकऱ्यांना काही अडचणी आल्या, पण तरीही गावकऱ्यांनी हार मानली नाही आणि हे स्थानक सुरूच ठेवले. ग्रामस्थांच्या मेहनतीचे फळ आहे की या स्थानकावरून दर महिन्याला रेल्वेला 30 हजारांहून अधिक उत्पन्न मिळते. जे स्थानक एकेकाळी बंद होणार होते, आता तेथे 10 हून अधिक गाड्या थांबतात.