ट्रेन म्हणजे सर्वसामान्यांसाठी खिशाला परवडणारा प्रवास आहे. यामुळे जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाला जाताना प्रवाशांकडून एक्स्प्रेसला पसंती दिली आहे. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त लागत असला, तरी पैशांची मात्र मोठी बचत होते. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. आता तर रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारतसारख्या अत्याधुनिक एक्स्प्रेसही आल्या आहेत. पण एकीकडे वंदे भारत आणि दुसरीकडे आधीपासून असणाऱ्या एक्स्प्रेस अशी तुलना आता होऊ लागली आहे. याचं कारण अद्यापही जुन्या ट्रेनमध्ये वंदे भारतसारखी स्वच्छता दिसत नाही. नुकतंच एका महिला प्रवाशाला असाच अनुभव आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला प्रवाशाने एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना डब्यात चक्क उंदिर फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जस्मिता असं या तरुणीचं नाव आहे. तिने 19 मार्चला एक्सवर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. यानंतर रेल्वेनेही त्यावर फक्त 3 मिनिटात उत्तर दिलं आहे. 'काहीतरी लवकर करण्याची गरज आहे,' असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी तिने सोबत व्हिडीओही शेअर केला आहे. 



जस्मिताने आपल्या पोस्टमध्ये दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओत उंदीर डब्यात सीटखाली फिरताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत तिने डब्यातील अस्वच्छता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओत आरशावर धूळ बसलेली दिसत आहे. 


“या ट्रेनच्या प्रवासात आजूबाजूला उंदीर फिरताना पाहून आणि स्वच्छतेची भयावह परिस्थिती पाहून धक्का बसला. या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने काहीतरी करणे आवश्यक आहे,” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टमध्ये रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वे आणि रेल्वे सेवा यांच्या अधिकृत X खात्यांना टॅग करत म्हटलं आहे. 



दरम्यान प्रवाशांच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेल्या रेल्वे सेवा अकाऊंटवरुन फक्त तीन मिनिटात या पोस्टला उत्तर दिलं आहे. त्यांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी सविस्तर माहिती मागितली. 


'कृपया तुमचा पीएनआर क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आमच्यासह शेअर करा. तात्काळ कारवाई करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट मेसेज करा,' असं उत्तर रेल्वे सेवेने दिलं आहे. 


बहुतेक वेळा एक्सवरुन प्रवासी आपल्या तक्रारींचा पाढा वाचत असतात. या तक्रारींना रेल्वे सेवा तत्परतेने प्रतिसाद देत असते. फेब्रुवारीमध्ये, एका तरुणीने प्रवासादरम्यान बहिणीला त्रास होत असल्यानंतर एक्सवर तक्रार केली होती. यानंतर रेल्वेने तात्काळ तिला मदत पुरवली होती. सहप्रवाशांनी तिची सीट ताब्यात घेतली होती आणि ती जागा रिकामी करण्यास नकार दिला होता. तक्रारीनंतर लगेचच, रेल्वे सेवेने पोस्टला प्रतिसाद दिला आणि त्यादरम्यान अधिकाऱ्यांनी तिला मदत केली.