धक्कादायक! चहा मागितला म्हणून बायकोने नवऱ्याच्या डोळ्यात घातली कात्री
नवऱ्याने चहा मागितला म्हणून पत्नीने चक्क कात्रीच डोळ्यात घालून हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
पतीने चहा मागितला म्हणून पत्नीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने कैचीने पतीवर हल्ला केला. तिने थेट पतीच्या डोळ्यातच कैची घातली. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यानंतर आरोपी पत्नीने पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी घटनास्थळावरुन पळ काढला. तर दुसरीकडे पती रक्तबंबाळ अवस्थेत घऱी पडला होता.
अंकित असं पीडित पतीचं नाव आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. पण लग्नानंतर काही दिवसातच दोघांमध्ये घरगुती कारणांवरुन भांडणं सुरु झाली होती. अंकितच्या पत्नीने तर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. विशेष म्हणजे या घटनेच्या तीन दिवस आधीच ही तक्रार दाखल कऱण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारीत तिने पती आणि सासरच्यांकडून छळ होत असल्याचा आरोप केला होता.
घटना घडली त्या दिवशी अंकितने एक कप चहाची मागणी केली होती. पण त्याने चहा मागितल्यामुळे आरोपी पत्नी संतापली. तिने घरातील कैची उचलून त्याच्या डोळ्यात घातली. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे अंकितची वहिनी आणि लहान मुलं धावत बाहेर आली. यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधी अंकितच्या पत्नीने पळ काढला होता. तर दुसरीकडे अंकित रक्तबंबाळ अवस्थेत घऱात पडला होता. पोलीस अंकितला उपचारासाठी कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये घेऊन गेले होते. यानंतर त्याला मेरठला नेण्यात आलं. दरम्यान आरोपी पत्नीला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध सुरु केला आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
गाझियाबादमध्येही अशीच घटना
गाझियाबादमध्ये चहा देण्यास पत्नीला उशीर झाल्याने पतीने पत्नीवर थेट तलवारीने जीवघेणा वार करत तिची हत्या केली. यानंतर आरोपी पतीने पळ काढला होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गाझियाबद जवळच्या भोजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फाजलगड गावात हे प्रकरण घडलं आहे. हत्येनंतरही आरोपी पती तिथेच हातात तलवार घेऊन ती फिरवत उभा होता. शेजाऱ्यांनी त्याच्या हातातील तलवार हिसकावून घेतली आणि त्याला पकडलं. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र तोपर्यंत आरोपी तेथून फरार झाला.