1500 रुपयांसाठी महिलेला नग्न केलं, नंतर तिच्यासमोर पँटची चेन काढून...; बाप आणि लेकाने गाठली क्रौर्याची सीमा
कर्ज फेडल्यानंतर आणखी पैसे देण्याची मागणी केली असता दलित महिलेने ते देण्यास नकार दिला. यानंतर आरोपींनी तिच्या घरात घुसून तिचा छळ करत नग्न केलं आणि नंतर मलमूत्र पाजलं.
बिहारच्या पाटणात दलित महिलेला नग्न करत अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर महिलेला आरोपींनी मलमूत्रही पाजलं. आरोपींमध्ये बाप आणि लेकाचा समावेश आहे. कर्जाची परतफेड केल्यानंतरही आरोपी महिलेकडे अधिक पैशांची मागणी करत होते. महिलेने मात्र पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होता. यामुळेच आरोपींनी रात्री तिच्या घरात घुसून हे धक्कादायक कृत्य केले.
आरोपींनी केलेल्या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद सिंग आणि त्याचा मुलगा अंशू आपल्या चार साथीदारांसह महिलेच्या घरात घुसले होते. रात्री 10 वाजता आरोपी महिलेच्या घरात घुसले आणि तिला आपल्या घरी घेऊन गेले होते.
महिलेला घरी नेल्यानंतर आरोपींनी तिला मारहाण केली. महिलेला काठीने मारहाण करण्यात आला. यानंतर तिला नग्न केलं. इतकंच नाही तर प्रमोद सिंग याने आपल्या मुलाला महिलेच्या तोंडात मूत्रविसर्जन करण्यास सांगितलं. पण पीडित महिला तेथून पळ काढण्यात यशस्वी झाली. महिलेने पळ काढला आणि आपलं घर गाठलं.
पोलीस तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने काही महिन्यांपूर्वी प्रमोद सिंग याच्याकडून व्याजावर 1500 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. महिलेने व्याजासह हे सगळे पैसे परत केले होते. पण यानंतरही आरोपी महिलेकडून पैसे मागत होते. पण महिला पैसे देण्यास नकार देत होती.
प्रमोद सिंगने महिलेला जर पैसे दिले नाही तर तुला नग्न करुन गावात फिरवेन अशी धमकी दिली होती. महिलेने पोलिसांकडे या धमक्यांबद्दल तक्रार केली होती. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे. पीडित महिलेचं कुटुंब आणि दलित समाज आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. घटनेनंतर दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.