मुंबई : मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. या दोघांचं लग्न देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडमधल्या रुद्रपूरच्या त्रियुगी नारायण मंदिरात होऊ शकतं, अशी माहिती मिळतेय. भगवान शंकर आणि पार्वतीचं लग्नही याच ठिकाणी झाल्याची अख्यायिका आहे. या ठिकाणी लग्न केलेलं जोडपं जन्मोजन्मी एकमेकांबरोबर राहतं, असं सांगितलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मंदिरामध्ये भगवान शंकर आणि पार्वतीचं लग्न झाल्याच्या काही खुणा असल्याचंही सांगितलं जातं. मागच्या तीन युगांपासून या मंदिरात ज्वाला पेटलेली आहे. या ज्वालांना साक्षी ठेवून भगवान शंकर आणि पार्वतीनी लग्न केल्याची अख्यायिका आहे. या मंदिरामध्ये भाविक प्रसाद म्हणून लाकूड अग्नीमध्ये टाकतात आणि या लाकडाची राख प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. या राखेमुळे वैवाहिक जीवन सुखी होतं, असा भक्तांचा समज आहे.


या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन उत्तराखंड सरकार या ठिकाणाला वेडिंग डेस्टिनेशन म्हणून विकसीत करणार आहे. रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंदिर आणि या परिसरात तयार होणाऱ्या वेडिंग डेस्टिनेशनची माहिती घेतली आहे. उत्तराखंड सरकारही या लग्नामुळे वेडिंग डेस्टिनेशनच्या ब्रॅण्डिंगचा फायदा घेण्याच्या तयारीमध्ये आहे. उत्तराखंड आणि अंबानी परिवाराचं नातं तसं जुनंच आहे. मुकेश अंबानी अनेकवेळा चारधामच्या दर्शनाला उत्तराखंडमध्ये येतात.


श्लोका मेहता ही आकाश अंबानीची बालमैत्रिण आहे. श्लोकाचे वडिल हिरे व्यापारी असून ते रोसी ब्ल्यू या कंपनीचे एमडी आहेत. आकाश अंबानीनं श्लोकाला गोव्यामध्ये २४ मार्चला प्रपोज केलं होतं. यानंतर मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं होतं. आकाश अंबानी आणि श्लोकाच्या साखरपुड्याला सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय, जहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग, करण जोहर असे अनेक सेलिब्रिटीज साखरपुड्याला उपस्थित होते.


श्लोकानं धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये श्लोकानं लॉ आणि पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलं. अंबानी आणि मेहता कुटुंबिय बऱ्याच कालावधीपासून एकमेकांना ओळखतात.