गोव्यात राष्ट्रवादी-शिवसेनेला जमलं नाही ते `आप`ने करुन दाखवलं
Goa Election Results : गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी युती केली होती. मात्र, त्यांना यश मिळवता आले नाही. तर पहिल्याच प्रयत्नात `आप`ने विधान भवनात एंट्री केली आहे. `आप` दोन आमदार निवडून आले आहेत.
मुंबई : Goa Election Results : गोव्यात पुन्हा एकदा भाजपनेच विजय मिळवला. गोव्यात पुन्हा एकदा भाजप सरकारच येणार याची चिन्हे आहेत. गोव्यात भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे, गोव्यात सध्या भाजपला 20 जागांवर आघाडी मिळालीय. 40 सदस्यांच्या विधानसभेत संपूर्ण बहुमतासाठी 21 जागांची गरज आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी युती केली होती. मात्र, त्यांना यश मिळवता आले नाही. तर पहिल्याच प्रयत्नात 'आप'ने विधान भवनात एंट्री केली आहे. 'आप' दोन आमदार निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवारांचा पराभव केला. (Aam Aadmi Party's entry in Goa Legislative Assembly)
बाणावली विधानसभा मतदार संघातून व्हेन्झी व्हिएगस (आप) विजयी झालेत त्यांनी टोनी डायस (काँग्रेस) यांचा पराभव केला आहे. तर वेळ्ळी मतदार संघातून क्रूझ सिल्वा (आप) हे विजयी झाले आहेत. त्यांनी सावियो डिसिल्वा (काँग्रेस) यांचा पराभव केला आहे. काँग्रेसच्या पराभवाला 'आप' ने हातभार लावला आहे. मात्र, गोव्यात चांगली कामगिरी करणार असे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत होते. मात्र, त्याची पुरती निराशा झाली आहे.
बहुमतापासून भाजप केवळ 1 जागा दूर आहे. राज्यपाल श्रीधनर पिल्लई यांची आजच भाजप नेते भेट घेत सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 500 मतांनी निसटता विजय मिळवला. तर पणजी मतदारसंघातून मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांची बंडखोरी निष्फळ ठरली. उत्पल यांचाही पराभव झाला. केवळ 800 मतांनी त्यांचा पराभव झाला. अपक्ष आणि इतर पक्षांना घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसला जबरदस्त धक्का देत 'आप'ने सत्ता हस्तगत केली. पंजाबमध्ये 'आप'ने तब्बल 92 जागा पटकावल्या आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यासह नवजोत सिद्धू, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, शिरोमणी अकाली दलाचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल हे सगळेच पंजाबमधले दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. तर माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांचा पराभव झाला.