पोटच्या मुलींची अंधश्रद्धेतून हत्या, एकीचा त्रिशुळानं तर दुसरीचा डंबेलनं खून
उच्चशिक्षित आईवडिलांची बुद्धी भ्रष्ट
ब्युरो रिपोर्ट, झी २४ तास : कलियुगात मुली मेल्या तर मध्यरात्रीनंतर सत्ययुगात जन्म घेतील, या भ्रमातून आईवडिलांनी आपल्या पोटच्या तरुण मुलींची निर्घृण हत्या केलीये. आंध्र प्रदेशातल्या चित्तूर जिल्ह्यातील मदनापल्ली या गावातील ही धक्कादायक घटना आहे.
पद्मजा ही आयआयटी गोल्ड मेडलिस्ट खासगी आयआयटी कोचिंग सेंटर चालवते. तर पती पुरूषोत्तम नायडू सरकारी महाविद्यालायाचे प्राचार्य आहेत. 27 वर्षांची अलेख्या आणि 24 वर्षांची साईदिव्या या त्यांच्या मुली. मात्र या मध्यमवर्गीय चौकोनी कुटुंबात अंधश्रद्धेनं शिरकाव केला आणि होत्याचं नव्हतं झालं.
घरात पूजा मांडली गेली. मुली पुन्हा जिवंत होतील, या भ्रमातून आई पद्मजानं एका मुलीला त्रिशुळ खुपसला आणि तिची हत्या केली.त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या डोक्यावर डंबेलचे घाव घालण्यात आले. तिनंदेखील प्राण सोडला. हे सगळं सुरू असताना प्राचार्य असलेला त्यांचा बाप तिथंच होता.
तब्बल 24 तास मुली जिवंत होतील, या आशेनं हे दाम्पत्य मृतदेहांसोबत राहलं. त्यानंतर पुरूषोत्तमनं आपल्या एका सहकाऱ्याला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. सहकाऱ्याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यानं तातडीनं पोलिसांना फोन करून झाला प्रकार सांगितला.
पोलिसांना दिसलेलं दृष्य भयानक होतं. शरिरावर जखमा झालेले मुलींचे मृतदेह... सगळीकडे रक्ताचा सडा... पूजेचं साहित्य विखुरलेलं होतं. पोलिसांनी माथेफिरू आई-वडिलांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू केलीये.
या प्रकरणात कुणा मांत्रिकाचा वैगरे हात आहे का, याचा तपास केला जात असल्याचं मदनापल्लीचे पोलीस उपाधीक्षक रवीमनोहर चारी यांनी सांगितलंय.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हे कुटुंब घराबाहेर पडलंच नव्हतं.
घरात असं काहीतरी भयानक होत असेल, याची शेजाऱ्यापाजाऱ्यांना कल्पना येणंच शक्य नव्हतं.जे झालं ते भयानक आहे. स्वप्नांच्या दुनियेत रमण्याचं वय असलेल्या अलेख्या आणि साईदिव्या यांचा अंधश्रद्धेनं बळी घेतलाय... केवळ शिक्षण घेऊन आणि पदव्यांची माळ गळ्यात घालून बुद्धीमत्ता असतेच असं नाही, हेच या घटनेनं सिद्ध केलं.