नवी दिल्ली : महाराष्ट्रात शनिवारी सकाळी सर्वात मोठी राजकीय खेळी पाहण्यात आली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवमहाआघाडीचं सरकार येणार असल्याची चर्चा सुरु असताना अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील या राजकीय भूकंपानंतर अनेकांना धक्का बसला आहे. अशातच काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी नव्या सरकार स्थापनेवर हैराणी व्यक्त करत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विट करत, 'मी महाराष्ट्राबाबत ऐकलेली ही गोष्ट खरंच आहे का असा प्रश्न पडला, आधी या बातमीत कोणतंही तथ्य नसल्याचं वाटलं. पवारजी तुस्सी ग्रेट हो...जर हे असेल तर...अजूनही विश्वास बसत नाही' अशा आशयाचं ट्विट करत त्यांनी या सत्ता स्थापनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.



जवळपास गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या घडामोडींनंतर शनिवारी सकाळी अचानक राजकीय भूकंप झाला. एका रात्रीत राजकारण बदललं. एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. शिवसेनेने जनादेश नाकारला आणि इतर पक्षांशी युतीसाठी चर्चा करण्यास सुरुवात केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर अजित पवार यांनी चर्चेला कंटाळून भाजपाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया दिली आहे.


आज दुपारी १२.३० वाजता शरद पवार आणि उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत  ते आपली भूमिका मांडणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाशिवआघाडीच्या सरकारची चर्चा सुरु असताना अचानक एका रात्रीत राज्याच्या राजकारणाल हे मोठं वळण कसं लागलं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.