Acid Attack By Woman: बिहारमधील एका 24 वर्षीय तरुणीने तरुणावर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील तरुणाने या तरुणीशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिने हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये हल्लेखोर महिलेला मदत करणाऱ्या अन्य एका अनोखळी व्यक्ती फरार असून तिचा शोध सुरु आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला सीमरवाडा गावामध्ये घडला. पातेपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा गुन्हा घडला. जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव धर्मेंद्र कुमार असं असून तो 22 वर्षांचा आहे. धर्मेंद्र हा टॅक्सी चालक आहे. धर्मेंद्रवर हाजीपूरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. आरोपी आणि हल्लेखोर महिला सरिता कुमारी (24) दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. मागील 5 महिन्यांमध्ये हे दोघे रिलेशशीपमध्ये होते, अशी माहिती वैशाली पोलीस स्टेशचे निरिक्षक राजीव राजन कुमार यांनी दिली. 


रात्री 2 वाजताची भेट


"धर्मेंद्रला रात्री 2 वाजता या तरुणीचा कॉल आला. तिने त्याला भेटण्यासाठी बोलवलं. या तरुणीला धर्मेंद्र तिच्या घरी जाऊन भेटला. त्यानंतर तो घरी जाण्यास निघाला असता त्याच्यावर या तरुणीने हल्ला केला. या तरुणीबरोबर अन्य एका व्यक्तीने धर्मेंद्रच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले," असं पोलिसांनी सांगितलं आहे.


अ‍ॅसिड हल्ल्यानंतर तो जोरात किंकाळला अन्...


धर्मेंद्रवर हल्ला झाल्यानंतर तो जोरात ओरडल्याने शेजरी घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. "आरोपी तरुणीला अटक करण्यात आली आहे. धर्मेंद्रने जबाब नोंदवल्यानंतर त्या जबाबाच्या आधारेचे अटकेची कारवाई केली आहे. धर्मेंद्र सध्या हाजीपूर रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या डोळ्यांना आणि चेहऱ्यावर अ‍ॅसिडमुळे गंभीर जखमा झाल्यात," अशी माहिती पोलिसांनी दिली.


तरुणीने दिली कबुली


धर्मेंद्रने मागील 5 महिन्यांपासून आपण या तरुणीच्या संपर्कात होतो असं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी विवाहित असून तिला 3 मुलं आहे. आरोपी महिला काही काळापूर्वीच आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. धर्मेंद्रला माझ्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती असं सरिताने पोलीस चौकशीमध्ये सांगितलं. धर्मेंद्रने नकार दिल्याने त्याच्या चेहरा विद्रूप करण्याच्या हेतूने सरिताने अ‍ॅसिड हल्ला केल्याची कबुली दिली. या प्रकरणात सरिताला मदत करणारी व्यक्ती कोण होती? याचा तपास पोलीस करत असून सध्या सरिता पोलीस कोठडीमध्ये आहे.