पुन्हा महागाईचे चटके, सीमा शुल्क वाढीने एसीसह टीव्ही, फ्रिज महाग
आता केंद्र सरकारने एसी, टीव्ही, फ्रिजसह 19 चैनीच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात वाढ केली आहे. यामुळे या वस्तू महाग होणार आहेत.
नवी दिल्ली : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ झालेय. शंभरीकडे पोहोलेल्या पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता हैराण आहे. आता केंद्र सरकारने एसी, टीव्ही, फ्रिजसह 19 चैनीच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात वाढ केली आहे. यामुळे परदेशातून भारतात आयात होणाऱ्या या वस्तू आणखी महाग होणार आहेत. त्यामुळे महागाईत अधिक भर पडणार आहे.
केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे रुपयाचे मूल्य घसरत आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमालीचा घसरला आहे. यामुळे चालू खात्यामधील तोट्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकाराने चैनीच्या वस्तूंवर सीमा शुल्काल वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय आजरात्रीपासून लागू होत आहे.
आयात होणाऱ्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवून त्यांची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. आज मध्यरात्रीपासून हे शुल्क लागू होणार आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून या 19 वस्तूंवसाठी जादा शुल्क मोजावे लागणार आहे. आयात वस्तूंची मागणी घटली तर 'मेक इन इंडिया'ला प्राधान्य मिळेल, असे यामागील धोरण असल्याचे सांगण्यात येत आहे.