राजस्थान: बैठकीत न येणाऱ्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार
सचिन पायलट आपल्या मागणीवर ठाम...
जयपूर : आज काँग्रेसच्या बैठकीत न येणाऱ्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार आहे. काँग्रेसच्या या आमदारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. पक्षाकडून अनेकदा या आमदारांना इशारा देण्यात आला. सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आला. पण ते आपल्या मागणीवर ठाम आहेत.
दुसरीकडे काँग्रेस आमदारांच्या बैठकीत नेतृत्व बदलावर कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्षश्रेष्ठींकडून देखील नेतृत्व बदलावर कोणताही विचार झालेला नाही. त्यामुळे सचिन पायलट यांची ही मागणी मान्य होईल असं वाटत नाही.
बैठकीच्या आधी काँग्रेस नेते अविनाश पांडे यांनी सचिन पायलट यांना बैठकीत येण्याचं आवाहन केलं होतं. पण सचिन पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक आमदार कोणीही बैठकीला आले नाही.
सचिन पायलट यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हटलं आहे की, त्यांना पक्षाच्या हायकमांडकडून कोणतंही आश्वासन मिळालेलं नाही. सचिन पायलट यांना नेतृत्व बदल हवा आहे.
राजस्थान सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काल शक्तीप्रदर्शन केलं. 107 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला.
सचिन पायलट यांच्याकडे 22 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. आमदार सोशल मीडियावर अशोक गहलोत यांच्या विरोधात ट्विट करत आहेत. सचिन पायलट यांनी आपल्या समर्थक आमदारांसाठी गृह आणि वित्त खातं देखील मागितलं आहे.