चंद्र आणि शुक्रामध्ये तळपता सूर्य! मानवाला अंतराळात पाठवत भारत रचणार नवा विक्रम
चांद्रयाननंतर इस्त्रोने आता आपल्या नव्या मोहीम जाहीर केल्या आहेत.
ISRO missions 2023: चंद्रावर भारतीय तिरंगा फडकला. भारताने इतिहास घडवला. मात्र, आता इस्त्रो नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. इस्त्रोने मिशन चांद्रयाननंतर आता आपल्या नव्या मोहीम जाहीर केल्या आहेत. सूर्यावर स्वारी करणारे मिशन आदित्य, मानवाला अंतराळात पाठवणारी गगनयान मोहिम यासह इस्त्रो शुक्र ग्रहावर देखील स्वारी करणार आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकत भारताने विक्रम रचला आहे. अवघ्या जगात भारताचा डंका वाजल आहे. मात्र, आता भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार आहेत. पहिला भारतीय चंद्रावर उतरणार आहे. त्यासाठी इस्त्रोचं मॅन मिशन सज्ज झाले आहे.
इस्त्रो गगनयान मिशन
स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे भारतीयाला अंतराळात पाठवण्यासाठी इस्त्रो गगनयान मिशन राबवणार आहे. गगनयान प्रयोगामध्ये अंतराळवीरांनी पृथ्वीपासून 400 किमी उंचावर नेऊन तिथे 3 दिवस मुक्काम करत पुन्हा पृथ्वीवर आणण्याची ही संकल्पना आहे.
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन आदित्य
मिशन मॅन मूनसोबतच इस्त्रोने आणखी एक मोहिम जाहीर केली आहे. चंद्रानंतर आता इस्त्रोला सूर्यही खुणावतोय.. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन आदित्य राबवणार आहे. 2 सप्टेंबरला हे यान प्रक्षेपित करण्यात येईल. सूर्याचा अभ्यास करणारी ही इस्त्रोची अंतराळातली पहिली वेधशाळा असेल. मिशन आदित्य हे इस्त्रोचं सर्वात कठीण मिशन आहे.. मात्र हे मिशन अंतराळ संशोधनात एक नवा अध्याय लिहिणार आहे.
पृथ्वी आणि सूर्यामधलं 15 कोटी किलोमीटर अंतर पार करणार मिशन आदित्य
सूर्याची किरणं पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 8 मिनिटं लागतात. पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर हे 15 कोटी किलोमीटर इतकी आहे. तेव्हा हे मिशन आदित्य साधारण 120 दिवसांचं म्हणजे 4 महिन्यांचं असेल. सूर्याच्या कक्षेत पोहोचल्यावर तिथल्या सौर वातावरणाचा अभ्यास करुन ती माहिती पृथ्वीवर पाठवली जाईल.
लवकरच शुक्र मोहिम
चांद्रयान-3 मिशन यशस्वी झाल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सूर्यचं नाही तर शुक्राच्या दिशेनेही आगेकूच करायचं ठरवल आहे. तेव्हा शुक्र मोहिमसुद्धा लवकरच सुरु केली जाणार आहे. इस्त्रो ही मोहिमही यशस्वीरित्या पार पडेल यात काहीच शंका नाही.