नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांना एकत्र घेऊन काम करायला जमले नाही. या कामगिरीने निराश झालेली जनता त्यांना पुन्हा बहुमताने निवडून देणार नाही, असे भाकीत ब्रिटीश राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई यांनी वर्तविले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मेघनाद देसाई हे नरेंद्र मोदी यांचे प्रशंसक म्हणून ओळखले जातात. मात्र, आता त्यांनीच मोदींच्या कारभारावर ताशेरे ओढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मेघनाद देसाई यांनी 'पीटीआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मोदींनी जनतेला भरमसाठ आश्वासने देऊन ठेवली. तसेच आपण गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना मोजक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कारभार केला तसाच देशही चालवू असे मोदींना वाटले. मात्र, त्यांचा हा अंदाज सपशेल चुकला. या सगळ्यामुळे देशातील जनता निराश झाली. त्यामुळे 'अच्छे दिन अब तक नही आये' या भावनेने लोकांच्या मनात घर केल्याचे देसाई यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी यांना सुवर्णसंधी मिळाली होती, पण सर्वांना एकत्र घेऊन काम न करू शकल्याने ही संधी वाया गेली. मोदी भले चांगले राजकारणी असतील पण सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी त्यांच्याकडे नाही. ते लोकप्रिय नेते असतील पण चांगले टीम लीडर नाहीत, अशी टिप्पणी मेघनाद देसाई यांनी केली. तसेच अरूण जेटली आणि सुषमा स्वराज वगळता मोदींच्या मंत्रिमंडळातील कोणताही नेता फारसा अनुभवी नसल्याकडेही देसाई यांनी लक्ष वेधले.


यूपीए सरकारच्या काळात याउलट परिस्थिती होती. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना साथ देण्यासाठी प्रणब मुखर्जी, अर्जून सिंह, शरद पवार. पी. चिदंबरम यांच्यासारखे खंदे नेते होते. मात्र, मोदींना ही गोष्ट उमगलीच नाही आणि आता परिस्थिती खूपच अवघड होऊन बसली आहे. अशावेळी एकच उपाय उरला आहे की, मोदींनी जनतेकडे आणखी एक संधी मागावी. यावेळी देसाई यांना मोदी नम्र आहेत का, असा प्रश्नही विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना देसाई यांनी म्हटले की, हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांचे निकाल त्यांना नम्र व्हायला भाग पाडतील, अशी टिप्पणी त्यांनी केली.