अदनान सामीसोबत गैरवर्तवणूक, म्हटलं इंडियन डॉग
अदनान सामीला दिली चुकीची वागणूक
मुंबई : परदेशात भारतीय सेलिब्रिट्रीजसोबत धर्म आणि राष्ट्रीयत्वच्या मुद्दावर अनेकदा गैरवर्तन झालं आहे. गायक अदनान सामीला देखील याचा फटका बसला आहे. या घटनेची माहिती अदनान सामीने त्याच्या ट्विटर हँडलवर ट्विट केली आहे. कुवैतमध्ये त्याच्या टीमसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार त्याने केली आहे. कुवैत एअरपोर्टवरील स्टाफने गैरवागणूक दिल्याचं त्याने म्हटलं आहे.
अदनान सामी कॉन्सर्टसाठी कुवैतला पोहचला होता. कुवैतमध्ये एअरपोर्ट स्टाफने चुकीची वागणूक दिलीच पण त्यांना इंडियन डॉग देखील म्हटलं. कोणतंही कारण नसतांना अशा प्रकारे वागणूक दिली गेली. अदनान सामीने ट्विट केल्यानंतर राज्य गृहमंत्री किरण रिजेजू यांनी ट्विट करत म्हटलं की, मी क्षमस्व आहे तुम्हाला असं ऐकावं लागलं. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या प्रकरणावर लक्ष देत आहेत. तुम्ही त्यांना संपर्क करु शकता.'
अदनान सामीने किरण रिजेजूंच्या ट्विटवर उत्तर देत म्हटलं की, 'या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे आणि माझी चिंता केल्यामुळे धन्यवाद. मी सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करतो आहे. मला अभिमान आहे की त्या आपल्या परराष्ट्र मंत्री आहेत.'
अदनान सामी आधी पाकिस्तानी नागरिक होता पण 2015 मध्ये त्याने भारताचं नागरिकत्व स्विकारलं. सामीने पाकिस्तानी पासपोर्ट एक्सपायर झाल्यानंतर भारतीय नागरिकत्वसाठी अर्ज केला होता. त्यानतंर त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं होतं.