नवी दिल्ली: भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या राहुल गांधी यांच्या विधानाला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करून राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले आहेत. राहुलजी अडवाणी आमच्यासाठी पितृतुल्य व्यक्तीमत्व आहे. तुम्ही त्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कृपया तोंड सांभाळून बोलता जा, असे सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथील भाषणात लालकृष्ण अडवाणी यांना भाजपमध्ये मिळत असलेल्या वागणुकीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. लालकृष्ण अडवाणी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू. पण या गुरुची अवस्था काय झाले. मोदी यांनी जोडे मारून लालकृष्ण अडवाणी यांना स्टेजवरून खाली उतरवले, असे राहुल यांनी म्हटले होते. 



भाजपाची 'समृद्ध अडगळ'


भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीसाठी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या ज्येष्ठ नेत्यांना वयोमर्यादेचे कारण देत तिकीट नाकारले होते. अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली. यावर अडवाणी यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ब्लॉग लिहून त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते.