नवी दिल्ली :  पुलवामा य़ेथील दशवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेस पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा कोंडी करण्यास भारताने सुरूवात केली आहे. त्यांचा विशेष राष्ट्राचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. देशभरातील जनतेमध्ये पाकिस्तान विरुद्ध चीड पाहायला मिळत आहे. पाकिस्तान सोबत युद्ध करा, पाकिस्तानला संपवून टाका अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्यानंतर लगेच पाकिस्तानसोबत युद्ध पुकारण्याची गरज नाही असे वक्तव्य विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. लातूरमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान काश्मीर मधील पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यानंतर लगेच पाकिस्तान सोबत युद्ध पुकारण्याची गरज नसल्याचे ऍड. निकम म्हणाले.  काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण आहे या परिस्थितीला काश्मीरला असलेला विशेष दर्जा हाच कारणीभूत असून काश्मीरी जनतेला काश्मीर हे वेगळे राष्ट्र वाटत आहे.  देशातील इतर नागरिक जोपर्यंत तिथे राहून प्रॉपर्टी विकत घेऊन नाहीत तोपर्यंत काश्मिरमधील परिस्थिती बदलणार नाही.  त्यामुळे लवकरात लवकर काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचीच मागणी ऍड उज्ज्वल निकम यांनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केली आहे.



सात जण ताब्यात


जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराची ४० जवान शहीद झालेत. या हल्ल्याप्रकरणी सुरक्षादलाने कारवाई सुरू केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या संशयावरून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज सात जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या सातही जणांकडे कसून चौकशी केली जात आहे. पुलवामा जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून या सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 


येथे रचला कट


या भीषण दहशतवादी हल्ल्याचा कट पुलवामाच्या त्राल परिसरात रचण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. २०१६ मध्ये हिजबुलचा टॉप कमांडर बुरहान वानीचा खात्मा त्राल येथेच झाला होता. त्याच्या खात्म्यानंतर पुढील चार महिने काश्मीर खोऱ्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. या हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरीक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती असा पोलिसांना संशय आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल भागात तो जैशचं नेटवर्क सांभाळतो, अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिली असून त्याचाही शोध घेतला जात आहे.