प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील खाद्यपदार्थांच्या दरात 60 ते 70 टक्क्यांनी घट
Affordable Food And Drinks At Airports Soon: विमानतळावर लवकरच स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला आहे.
Affordable Food And Drinks At Airports Soon: विमानतळावर खाद्यपदार्थ अव्वाच्या सव्वा किंमतीत विकली जातात. त्यामुळं सर्वसामान्य नागरिक सहसा विमानतळावरील खाद्यपदार्थ घेत नाही. मात्र, आता सर्वसामान्यांसाठी मोठी माहिती समोर येतेय. जर तुम्ही कामानिमित्त किंवा सुट्ट्यांसाठी बाहेरगावी विमानाने जात असाल तर आता विमानतळावरील खाद्यपदार्थ परवडणाऱ्या दरात मिळणार आहे. भारतीय विमान प्राधिकरण विमानतळांवर इकॉनॉमी झोन अनिर्वाय करणार आहे, अशी माहिती समोर येतेय.
भारतीय विमान प्राधिकरण विमानतळांवर इकॉनॉमी झोन अनिर्वाय करणार आहे. म्हणजेच प्रत्येक विमानतळावरील काही जागा इकॉनॉमी झोन म्हणून राखीव ठेवली जाणार असून तिथे प्रवाशांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ खरेदी करता येणार आहेत. लवकरच विमानतळावर इकॉनॉमी झोन सुरू करण्याचा प्राधिकरणचा विचार आहे. मात्र, येथे प्रवाशांना रेस्तराँप्रमाणेच बसण्यासाठी जागा मिळणार नाही तर, काउंटरवरुनच प्रवाशांना खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यावी लागणार आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी खाद्यपदार्थ सुमारे 60 ते 70 टक्के स्वस्त दरात मिळणार आहे. म्हणजेच एका चहाची किंमत 125 रुपये असेल तर इकॉनॉमी झोनमध्ये फक्त 50 ते 60 रुपयांत मिळणार आहे. मात्र या इकॉनॉमिक झोन मध्ये सेवा आणि खाद्यपदार्थांच्या प्रमाणामध्ये फरक असेल. म्हणजे बसण्याऐवजी उभे राहण्यासाठी टेबल असतील. चहा लहान कप किंवा ग्लासेसमध्ये दिला जाईल. पूर्ण जेवणाऐवजी मर्यादित जेवण असेल. पॅकिंगच्या मूलभूत गुणवत्तेत खाद्य पदार्थ उपलब्ध असतील.
विमानतळावर खाद्यपदार्थ अवाजवी दरात विकले जातात. आत्तापर्यंत अनेक ग्राहकांनी याबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यानंतर अनेकदा बैठका घेऊन नागरी उड्डाण मंत्रालय या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांतच विमानतळावर इकॉनॉमी झोन तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. सध्या मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कोची विमानतळावरील देशांतर्गत उड्डाणांच्या निर्गमन क्षेत्रात अशी ठिकाणे इकॉनोमिक झोनसाठी निश्चित करण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. येथे परवडणाऱ्या दरात ६ ते ७ खाद्यपदार्थ दुकाने उघडतील.