‘तिथे गेलो तर, ठार करतील’, अफगाण स्पेशल फोर्सचा जवान आज दिल्लीत तळतोय फ्रेंच फ्राईज
भय इथले संपत नाही...
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरु असणारा रक्तरंजित सत्तासंघर्ष आता चिंताजनक वळणावर पोहोचला आहे. या देशातून नागरिक जीव मुठीत घेऊन पळ काढत आहेत, यामध्ये कित्येकांना जीवही गमवावा लागला आहे. अशातच देश सोडून गेलेल्यांच्या मनात अद्यापही भीती कायमच आहे.
जवळपास पाच महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या उमेदसाठी परिस्थिती कधीच सोपी नव्हती. ‘एनबीटी’च्या वृत्तानुसार उमेद स्पेशलफोर्समध्ये सेवेत होता, पण आता मात्र दिल्लीतील लाजपत नगरमध्ये तो फ्रेंच फ्राईज तळतोय. दिवसाला 300 रुपये कमवणाऱ्या उमेदला त्याच्या भविष्याची चिंता दर क्षणाला भेडसावतेय.
Afganistan Crisis : काबूलमध्ये अडकलेले भारतीय दहशतीखाली; सरकारकडे मदतीची मागणी
आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचं स्वप्न उराशी बाळगूनही सुरुवात कुठून करावी असाच प्रशन त्याला पडत आहे. तालिबान्यांच्या (taliban) क्रूर हल्ल्यात मारल्या गेलेल्या मित्रांची त्याला क्षणोक्षणी आठवण येतेय. मायदेशी परतणं आता जवळपास अशक्यच असल्यामुळं तो भारतात रेफ्यूजी कार्डवर राहत आहे.
तिथं गेलो तर ठार मारतील...
तालिबान्यांशी संघर्ष करत असताना अनेक दहशतवाद्यांना ठार केलं, विविध ठिकाणी तैनात होतो, त्यावेळी तालिबान्यांशी सतत सामना होत होता, ज्यामुळं मी त्यांच्या निशाण्यावर आहे; असं उमेद सांगतो. आता तिथे गेलो, तर मला ते ठार मारतील अशा शब्दांत मनातील भीती व्यक्त करताना त्यानं शरीरावर असणारे जखमांचे व्रण दाखवले. जखमा झाल्या फक्त, गोळी लागली नाही, पण माझ्या मित्रांना मात्र डोळ्यांदेखत मरताना पाहिलं, तेव्हा सरकार काहीच करत नव्हतं. पळालो नसतो तर एकतर दहशतवाद्यांशी हातमिळवणी करावी लागली असती किंवा मग जीव गेला असता हे दोनच पर्याय माझ्यापुढे होते, अशा शब्दांत त्यानं अफगाणिस्तानातील वास्तव सर्वांपुढे ठेवलं.
भारतानं आसरा दिल्याबद्दल त्याच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. पण इथं अफगाणी नागरिक म्हणून वावरणं सोपं नाही, हेसुद्धा तो सांगतो. अफगाणी म्हणून इथं काम मिळणं कठीण आहे, दुसरा देश, नवे नियम, घरभाडं, काम अशा अनेक अडचणी आहेत. आता उमेदकडे युनिसेफचं कार्ड आहे, पण पुढेही त्याला मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागणार आहे. आव्हानं मोठी आहेत, परिस्थितीही बिकट आहेत. परतीच्या वाटा जवळपास बंद झाल्या आहेत, पण त्याची जगण्याची ‘उमेद’ मात्र कायम आहे.