Sharad Pawar On Modi Degree Row: अदानी प्रकरणानंतर आता मोदी डिग्री प्रकरणावरुन शरद पवारांचा विरोधकांना घरचा आहेर
Sharad Pawar On Modi Degree Row: अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंसारख्या विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदींच्या डिग्रीचा मुद्दा लावून ठरलेला आहे. अशातच पत्रकारांनी शरद पवारांना या विषयासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Modi Degree Row Sharad Pawar Reacts: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणासंदर्भात (Adani Issue) 2 दिवसांमध्ये घेतलेल्या दोन वेगवेगळ्या भूमिकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यातच आता पवारांनी नेत्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन वाद घालणाऱ्यांना टोला लगावला आहे. नेत्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुनावताना पवारांनी, काही जण असे मुद्दे उपस्थित करत आहेत ज्यावर नंतरही बोलणं होऊ शकतं. सध्या देशात यापेक्षा फार महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर राजकीय क्षेत्रातून भाष्य होणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पदवीच्या (Modi Degree Row) मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित केलेले.
डिग्रीवरुन केजरीवालांना 25 हजार दंड
काही आठवड्यांपूर्वीच गुजरात हाय कोर्टाने मोदींच्या डिग्री प्रकरणावरुन अरविंद केजरीवाल यांना दणका दिला होता. कोर्टाने केंद्रीय सूचना आयोगाला 2016 साली देण्यात आलेला आदेश रद्द केला होता. या आदेशामध्ये मोदींच्या डिग्रीसंदर्भातील माहिती केजरीवाल यांनी मागितली होती. मात्र ही माहिती उपलब्ध करुन देण्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्ये केजरीवाल यांच्याविरोधात कोर्टाने निर्णय दिला. कोर्टाने या प्रकरणामध्ये केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. उद्धव ठाकरेंनी मोदींच्या डिग्री प्रकरणाबद्दल बोलताना खोचक टोला लगावला होता. असं कोणतं कॉलेज आहे जे पंतप्रधान मोदींनी आमच्याकडे शिक्षण घेतल्याचं गर्वाने सांगण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीय? असा खोचक प्रश्न उद्धव यांनी विचारला होता.
पवारांचा विरोधकांनाच टोला
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पत्रकरांनी याच विषयासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था आणि महागाईवर सध्या चर्चा होणं आवश्यक आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी नेत्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्द्यापेक्षा या अशा मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. या अशा (लोकांशी संबंधित) मुद्द्यांवर र्चा होऊ शकते. मात्र नेत्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील मुद्दे गरज नसताना उपस्थित केले जात आहे. आज कॉलेजच्या डिग्रीचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तुमची डिग्री काय? माझी डिग्री काय? हे काय राजकीय मुद्दे आहेत का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.
राऊतांनीही केलेली टीका
याच मुद्द्यावरुन पवारांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीही मोदींना टोला लगावला होता. मोदींची डिग्री ही नवीन संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ लावावी म्हणजे आपले पंतप्रधान किती शिकलेले आहेत हे सर्वांना समजेल असा उपरोधिक टिका राऊत यांनी केली होती.