ठुकरा के मेरा प्यार... गर्लफ्रेन्डने ब्रेकअप केल्यानंतर तरुणाला मिळाले 25 हजार; वाचा नेमकं काय घडलं
Breakup Story : प्रेमात फसवणूक झाल्यानंतर, एखादी व्यक्ती एकतर मनातून उतरते किंवा तिचा प्रेमावरील विश्वास उडतो. मग अशावेळी काही लोक टोकाचा निर्णय घेतात. मात्र एका प्रियकराला ब्रेकअपनंतर चांगलाच फायदा झालाय. ट्विटरवर या प्रियकराने त्याच्या ब्रेकअप स्टोरीची माहिती दिली आहे
Viral Story : प्रेमात (Love Affair) फसवणूक झाल्याने अनेक जण आतून तुटून जातात आणि दुःखी होतात. आपलं प्रेम आपल्याला सोडून गेलं आहे हे पचवणं अनेकांना जड जातं. काही जण तर टोकाचं पाऊल उचलतात तर काही प्रेमवीर काहीजण चुकीचे निर्णय घेतात. मात्र एका पठ्ठ्याला त्याच्या ब्रेकअपनंतर (Breakup) चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ब्रेकअपचा निर्णय घेणे एकासाठी फायदेशीर ठरले आहे. गर्लफ्रेंन्डने सोडल्यानंतर या प्रियकराला 25,000 रुपये मिळाले आहेत. ट्विटरवर (Twitter) या प्रियकराने याबाबत माहिती दिली आहे.
या ट्विटर युजरने त्याला ब्रेकअपनंतर इन्शुरन्सची रक्कम म्हणून 25,000 रुपये मिळाल्याचा दावा केला आहे. प्रतीक आर्यन नावाच्या ट्विटर युजरने ट्विट करुन माहिती दिल्यानंतर ते सगळीकडे व्हायरल झाले. माझ्या गर्लफ्रेन्डे माझी फसवणूक केली आणि त्यासाठी मला 25 हजार रुपये मिळाले, असे प्रतिक आर्यनने म्हटलं आहे. 16 मार्च रोजी प्रतिक आर्यनने हे ट्विट केले होते. थोड्याच वेळात प्रतिकच्या या ट्विटला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. प्रतीक आर्यनने या रकमेला हार्टब्रेक इन्शुरन्स फंड म्हटले आहे.
जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो होता तेव्हा एक रक्कम जमवण्याचे ठरवले होते आणि त्यातूनच ही रक्कम मिळाल्याचे प्रतिकने सांगितले आहे. "माझ्या गर्लफ्रेन्डने फसवणूक केल्यामुळे मला 25 हजार रुपये मिळाले आहेत. आमचं नातं सुरू झालं तेव्हा आम्ही दोघेही प्रत्येकी 500 रुपये जॉइंट अकाउंटमध्ये जमा करायचो. तेव्हा आम्ही ठरवले होते, जो कोणी ब्रेकअप करेल, त्याचे पैसे बुडतील आणि जो विश्वासघात करणार नाही त्याला हे पैसे मिळतील," असे प्रतिकने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आणखी एका पोस्टमध्ये या हार्टब्रेक इन्शुरन्स फंडात गुंतवणूक करणे जोखमीचे असल्याचे सांगितले आहे. तसेच यामध्ये रिलेशनशिप लॉयल्टी रिस्क असल्याचे देखील म्हटले आहे. म्हणूनच प्रेमाशी निगडीत वचन देताना अतिशय ते काळजीपूर्वक द्यायला हवे. महिलांना इन्शुरन्स फंडाचा लाभ मिळावा असे का वाटते. निष्ठावंतांनाच ही पॉलिसी मिळायला हवी, असेही प्रतिक आर्यनने म्हटले आहे.
आता प्रतिकच्या ट्विटवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. प्रतीकच्या पोस्टवर एका यूजरने 'एवढ्या रकमेचे काय करणार?' असा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रतिकने याची मी दुसऱ्या नात्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे असे म्हटले. दुसऱ्या एका युजरने 500 रुपयांची रक्कम कमी असल्याचे म्हटले आहे. त्यावर उत्तर देताना प्रतिकने, आम्ही ही रक्कम आमच्या खिशातून टाकली असून पुढच्या वेळी मी एक लाख रुपयांचा विमा काढेन, असे म्हटलं आहे.