मोदींच्या विजयानंतर `टाईम`चा यूटर्न
लोकसभा निवडणुकीदरम्यान टाइमने आपल्या कव्हर पेजवर मोदींना `डिव्हायडर इन चीफ` म्हटले होते.
नवी दिल्ली: अवघ्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आंतरराष्ट्रीय टाइम मॅगझिनने घणाघाती टीका केली होती. पण मोदींच्या देदिप्यमान, ऐतिहासिक विजयानंतर 'टाइम' बदलला आहे. त्यामुळे 'टाइम'ने चक्क मोदींवर स्तुतिसुमने उधळली.
अवघ्या काही दिवसांपूर्वी १० मे रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान टाइमने आपल्या कव्हर पेजवर मोदींना 'डिव्हायडर इन चीफ' म्हटलं होते. ख्यातनाम पत्रकार आतिश तासीर यांनी तो लेख लिहिला होता. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत हा लेख प्रकाशित झाल्याने खळबळ उडाली होती. त्या लेखात तासीर यांनी मॉब लिंचिंग आणि योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी बसवण्यावरून मोदींवर ताशेरे ओढले होते.
मात्र लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर टाइमनं घूमजाव केले. मोदींच्या अभूतपूर्व यशानंतर टाइमनं २८ मे रोजी नवा ताजा लेख प्रकाशित केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान 'नरेंद्र मोदी फॉर पीएम' नावाची मोहीम चालवणाऱ्या मनोज लडवा यांनी हा ताजा लेख लिहिला आहे.
मोदी यांच्या सामाजिकदृष्ट्या प्रगतीशील धोरणांनी अवघ्या भारतीयांना गरिबीतून बाहेर काढले. हे कोणत्याही मागील सरकारांच्या तुलनेत अतिशय वेगाने घडलेय. मोदींच्या धोरणांवर कटु आणि बहुधा अन्यायकारक टीका झाल्यानंतर त्यांनी गेल्या कार्यकाळात आणि या निवडणुकीत पाच दशकांमध्ये इतर कोणत्याही पंतप्रधानाला जमलं नाही अशाप्रकारे भारतीयांना एकजूट केल्याचे या लेखात म्हटले आहे.
विशेष म्हणजे 'टाइम'च्या वेबसाइटवर ताज्या लेखासोबत मोदींचा एक व्हिडिओ देखील पाहायला मिळतो. कोणासोबतही कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, असे मोदी या व्हिडिओद्वारे सांगताना दिसत आहेत. टाइम बदलायला वेळ लागत नाही, हेच मोदींनी यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.