मुंबई : दहावीची परिक्षा सुरू झालीय. परिक्षेचा एक ताण विद्यार्थी आणि पालकांवर असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या तणावात जेव्हा अघटीत घडतं तेव्हा.... सुरतमधील 15 वर्षाच्या हर्षवर अगदी कठीण प्रसंग ओडावला आहे. शैक्षणिक वर्षातील सर्वात मोठी परिक्षा सुरू असताना नियतीने त्याच्या समोर आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न उभा केला आहे. दहावीच्या परिक्षेच्या दिवसांतच हर्षच्या वडिवांचं निधन झालं आहे. तेव्हा या पठ्ठ्याने दाखवलेला समंजसपणा वाखाण्याजोगा आहे. 


कुठे घडला हा प्रकार? 


सूरतमधील कृष्णकुंज सोसायटीत राहणा-या हर्षच्या आयुष्यात मंगळवारी खूप मोठं वादळ आलं, जेव्हा त्याच्या वडिलांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. दहावीत शिकणा-या हर्षसाठी हा खूप मोठा धक्का होता. कुटुंबातील काही सदस्य उत्तर प्रदेशातून येणार असल्या कारणाने बुधवारी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी हर्षचा दहावीचा विज्ञानाचा पेपर होता. इतकं मोठं संकट कोसळलं असतानाही हर्षने मात्र दहावीची परिक्षा अर्ध्यात न सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजा-यांनी त्याला परिक्षेसाठी तयार केलं आणि केंद्रावर नेलं. काळाने आघात केला असतानाही हर्षने त्या परिस्थितीत परिक्षेला बसायचं ठरवलं. 


मुख्याध्यापिका काय म्हणाल्या? 


प्रेसिडन्सी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपिका शुक्ला यांनी सांगितलं आहे की, ‘हर्ष पूर्ण तीन तास वर्गात बसून होता, पण शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्याच्या भावनांचा बांध फुटला आणि तो जोरजोरात रडू लागला. हा प्रत्येकासाठीच अत्यंत भावनिक मुद्दा असतो. मी शाळेतील काही शिक्षकांना त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि उर्वरित प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सांगितलं. यानंतर त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने पेपर सोडवला’. शांती निकेतन शाळेचा विद्यार्थी असणा-या हर्षने सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिली आणि तीन तास परिक्षा केंद्रात बसून होता. परिक्षा दिल्यानंतर घरी पोहोचल्यावर हर्षने वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. एकुलता एक मुलगा असल्याने हर्षनेच वडिलांच्या मृतदेहाला मुखाग्नी दिला.