शिमला : भारत - पाकिस्तान दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात सहभागी झालेल्या एका माजी सैन्य अधिकाऱ्यानं गुरुवारी केलेला एक दावा चर्चेत आलाय. टायगर हिलवर पुन्हा एकदा ताबा मिळवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सेनेचं मनोबल वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी तिथं दाखल झाले होते, असा दावा या अधिकाऱ्यानं केलाय. भाजप नेता तसंच सेवानिवृत्त ब्रिगेडियर कुशाल ठाकूर हे नरेंद्र मोदींच्या देशभक्तीबद्दल बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय सुरक्षेबद्दल नरेंद्र मोदींची काळजी त्यांच्या टायगर हिल दौऱ्यानं लक्षात येते... उल्लेखनीय म्हणजे, त्यावेळी मोदी कोणत्याही महत्त्वाच्या पदावर नव्हते, अशी पुश्तीही ठाकूर यांनी जोडलीय. 


नरेंद्र मोदी त्यावेळी ना पंतप्रधान होते, ना गुजरातचे मुख्यमंत्री... परंतु, तरीही ते  ५ जुलै १९९९ रोजी (टायगर हिलवर ताबा मिळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी) ते टायगर हिलवर दाखल झाले होते. 


कुशाल ठाकूर त्यावेळी '१८ ग्रेनेडियर्स'चे कमांडिंग ऑफिसर होते. या तुकडीनं कारगिल युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावत पुन्हा एकदा कारगिलच्या टेकड्यांवर ताबा मिळवला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेश भाजपाचे प्रभारी होते, असंही ठाकूर यांनी म्हटलंय. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा आणि परदेशी नीतीमध्ये अनेक बदल दिसून आले, असा दावाही भाजप नेते ठाकूर यांनी केलाय. दहशतवादाला जराही थारा न देण्याची 'भगव्या पक्षाची' नीती सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्याच्या माध्यमातून स्पष्ट झाल्याचंही ठाकूर यांची खात्री आहे. 


कारगिल युद्धादरम्यान हिमाचल प्रदेशच्या ५२ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. यातील दोघांचा देशाचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार असलेला 'परमवीर चक्र' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भविष्यकाळात हिमाचल रेजिमेंट बनवण्याचा मुद्दाही केंद्रासमोर ठेवण्यात येईल, असंही ठाकूर यांनी म्हटलंय.