मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूचा मुंबईत वाढणारा एकंदर प्रादुर्भाव पाहता हॉटस्पॉट आणि कंटेंन्मेंट झोनमधून वार्तांकन करणाऱ्या पत्रकार, कॅमेरामन आणि वृत्तपत्रांच्या छायाचित्रकारांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब अहवालातून उघड झाली. ज्यानंतर आता पत्रकारांच्या वर्तुळात कोरोनाचा वाढता धोका पाहता, विविध राज्यांमध्ये काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. 



दरम्यान, १६ आणि १७ एप्रिल या दिवसांमद्ये मुंबईच्या आझाद मैदानात कोरोनाच्या चाचणी शिबिरांचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून माध्यमांच्या प्रतिनिधींचे स्वॅब नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. ज्यानंतर पत्रकारांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याची बाब उघड झाली होती. 


कोरोनाचा हाच फैलाव पाहता बिहारमध्येही विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे पत्रकारांसाठीच्या कोरोना चाचणी केंद्राची सुरुवात करण्याची मागणी केली. ट्विट करत त्यांनी ही मागणी केल्याचं पाहायला मिळालं. 



एकंदरच कोरोनासंदर्भातील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या या पत्रकारांसाठीही आता सतर्कतेची पावलं उचलली जात आहेत. शिवाय त्यांनीही पावलोपावली कोरोनासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायांना अंमलात आणावं असे निर्देशही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.