नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे निकाल २३ मे रोजी जाहीर झाले. या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरघोस मतांनी जनतेने पुन्हा एकदा निवडून दिलं आहे. लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालाच्या दिवशीच उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्याच्या आईने या मुलाचं नाव चक्क नरेंद्र दामोदरदास मोदी असं ठेवलं आहे. पण हे नाव ठेवण्यामागचं कारणही त्या मुलाच्या आईने सांगितलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ मे रोजी मुलाचा जन्म झाला. मुलाचे वडिल दुबईत राहतात. मुलाची आई मेहनाज यांनी ही आनंदाची बातमी आपल्या पतीला देण्यासाठी फोन केला. त्यावेळी मेहनाज यांच्या पतीने 'नरेंद्र मोदी आले आहेत का?' असा प्रश्न विचारला. त्यानंतर मी मुलाचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवल्याचं मेहनाज यांनी सांगितलं. 


नरेंद्र मोदी हे नाव ठेवण्यासाठी पती आणि कुटुंबियांकडे आग्रह केला. त्यानंतर त्यांची सहमती मिळाली आणि नरेंद्र दामोदरदास मोदी याच नावाचं जन्माचा दाखला बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला असल्याचं मेहनाज यांनी म्हटलंय.


मेहनाज या पंतप्रधान मोदींमुळे प्रेरित आहेत. नरेंद्र दामोदरदास मोदी या नावाने आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन हे नाव ठेवल्याचं मेहनाज यांनी म्हटलंय. मोदींच्या विजयासह घरात मुलाचा जन्म असा दुहेरी आनंद झाल्याचं त्यांनी सांगतिलं.



उत्तरप्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील वजीरगंजमधील परसापुर मेहरौर गावात राहणारं हे कुटुंब आहे. मेहनाज यांचे सासरे इदरीस यांनी त्यांचा मुलगा मुश्ताक दुबईत काम करतो. २३ मे रोजी सर्वांचंच लक्ष लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे होतं आणि त्याच दिवशी मला नातू झाला. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होत असल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. मेहनाजला आधी दोन मुली आहेत आणि आता नरेंद्र मोदीचा जन्म झाला आहे. 


नातवाचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी ठेवल्यानंतर अनेकांकडून चेष्टा करण्यात आली परंतु पंतप्रधान मोदींबाबत वैयक्तिक आस्था आहे आणि हा आमचा कौटुंबिक निर्णय आहे त्यामुळे यात कोणीही दखल देऊ शकत नसल्याचं मुलाचे आजोबा इदरीस यांनी म्हटलं आहे.