एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल, डिझेल दरवाढ सुरूच
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढीचं सत्र आज पुन्हा एकदा सुरू झालंय.
मुंबई : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढीचं सत्र आज पुन्हा एकदा सुरू झालंय. देशभरात आज पेट्रोलचे दर २७ पैसे आणि डिझेलचे दर २४ पैसे वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोलच्या एका लीटरसाठी ९० रुपये ३५ पैसे तर डीझेल ७८ रुपये ८२ पैसे वाढलेत.
पेट्रोल पंप अपग्रेड
ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. हे पाहता पेट्रोल कंपन्यांनीही पेट्रोल पंपावर असलेल्या आपल्या इंधन डिस्पेंसर्सला अपग्रेड करण्यास सुरूवात केलीयं. पेट्रोलच्या किंमती 3 अंकी झाल्यावरही डिस्पेंसर्सवर ते दिसावं यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.
जुन्या पंपांवर दोन आकडेच
बहुसंख्य पेट्रोल पंपाना अपग्रेड करण्याची गरज नाहीयं. पण जुन्या पेट्रोल पंपावर केवळ दोन आकड्यातल्याच किंमती दिसताहेत. येत्या दिवसात जर पेट्रोलच्या किंमतीत आणखी 10 रुपयांनी वाढ झाली तर जुन्या डिस्पेंसर्स वाल्या पंपांना अडचण होऊ शकते. पण सध्या तरी पेट्रोल कंपन्यांना दरवाढ 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटत नाही.