मुंबई : काही दिवसंपूर्वी 'इंडिगो फ्लाइट'ने विमान प्रवास करतेवेळी उपरोधिक विनोदी शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने पत्रकार अर्णब गोस्वामीवर निशाणा साधला होता. कुणालच्या या वर्तणुकीमुळे त्याच्यावर इंडिगोकडून सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली. त्यामागोमागच आता, एअर इंडिया, स्पाईसजेट आणि गो एअर यांच्याकडूनही याचीच पुनरावृत्ती करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंदीचं हे सत्र सुरु असतानाच यामध्ये आता आणखी एका घटनेमुळे पुन्हा एका नव्या मुद्द्याने डोकं वर काढलं आहे. कारण, एका कुणाल कामरामुळे नावात साम्य असणाऱ्या काही व्यक्तींनाही हे प्रकरण शेकत आहे. एअर इंडियाच्या एका प्रवाशाला नुकताच याचा प्रत्ययही आला. 


'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार कुणाल कामरा असंच नाव असणारा एक व्यक्ती बोस्टनहून त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी म्हणून भारतात आला. तेव्हा जयपूर विमातळावर त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला. कारण, होतं त्याचं नाव. जयपूरहून मुंबईकडे येण्यासाठी म्हणून जेव्हा तो विमानतळावरील पीएनआर काऊंटरवर पोहोचला, तेव्हा त्याचं नाव हे 'ब्लॅकलिस्ट'मध्ये असल्याचं सांगत तिकीट रद्द झाल्याची माहिती त्याला देण्यात आली. 



पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत


'तो मी नव्हेच....', अर्थात मी तो वादग्रस्त कुणाल कामरा नव्हे हे सिद्ध करण्यासाठी मग त्या व्यक्तीला बरेच प्रयत्न करावे लागले. 'माझं तिकीट रद्द करण्यापूर्वी काहीच सांगण्यातही आलं नव्हतं. किंबहुना मला त्याचं रितसर स्पष्टीकरणही देण्यात आलं नाही. तिकीट रद्द केलं जाण्याचं एकमेव कारण म्हणजे माझं नाव. आता फक्त नावामुळे माझं तिकीट रद्द होणार असेल तर ही बाब स्वीकारार्ह नाही. कारण, या एका नावाच्या अनेक व्यक्ती असतीलच', असं म्हणत त्या व्यक्तीने संताप व्यक्त केला. 


कुणाल कामरा हे नाव एकसारखं असलं तरीही तो मी नव्हे.... हे सिद्ध करण्यासाठी मग या व्यक्तीला अनेक ओळखपत्र, चेक इन पॉईंट्स अशी माहिती सादर करावी लागली. हा सर्व प्रकार नेमका काय असेल याची कल्पनाही नसताना एका प्रवाशाला अशा प्रकारे अडचणीत आणण्याची एअर इंडियाची ही भूमिका अनेकांना पटली नाही.