नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे धोकादायक ठिकाण झालेल्या वुहानमधील (चीन) भारतीयांना अखेर सुखरूप मायदेशी आणण्यात यश आले आहे. काल (शुक्रवारी) दुपारी एअर इंडियाचे विमान चीनच्या दिशेने रवाना झाले होते. यानंतर आज सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी हे विमान ३२४ भारतीयांना घेऊन दिल्ली विमानतळावर दाखल झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विमानातून आलेल्या सर्व लोकांना दिल्लीतील आरोग्य शिबिरात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची सध्या वैद्यकीय तपासणी सुरु आहे. जेणेकरून यापैकी कोणालाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे का, याची खातरजमा करणे शक्य येईल. या लोकांना आणखी किती काळ आरोग्य शिबिरात ठेवले जाईल, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. चीनच्या वुहान विद्यापीठात मोठ्याप्रमाणावर भारतीय विद्यार्थी शिकायला आहेत. या विद्यार्थ्यांना विमानमार्गे थेट भारतात आणण्यासाठी भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने चीनची परवानगी मागितली होती.



कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरची लागण होऊन २५९ जणांचा बळी गेला आहे. तर तब्बल ११ हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.या व्हायरसने भारतामध्येही शिरकाव केला आहे. कालच केरळमध्ये कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली होती. यानंतर चीनमधून उत्तराखंडच्या ऋषीकेशमध्ये परतलेल्या एका तरुणीलाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. ही मेडिकलची विद्यार्थिनी आहे. तिचे सॅम्पल्स पुण्यातल्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 



कोरोना व्हायरसच्या धास्तीमुळे जगभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या व्हायरसने आतापर्यंत तब्बल २७ देशांमध्ये शिरकाव केल्याची माहिती आहे. चीनमधील वुहान हे शहर कोरोना व्हायरसचे केंद्र झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.