जय हिंद! एअर इंडियाच्या प्रत्येक प्रवासात गुंजणार देशभक्तीचा सूर
प्रत्येक घोषणेनंतर `जय हिंद` बोलावं, एअर इंडिया आग्रही
मुंबई : देशातील काही महत्त्वाच्या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये विश्वासार्ह आणि अनेकांचच प्राधान्य असणाऱ्या एअर इंडिया या एअरलाईनकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या विमानसेवा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि अर्थातच प्रवाशांच्याही दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय ठरत आहे. एअर इंडियाच्या प्रत्येक विमान प्रवासामध्ये केबीन क्र्यू आणि कॉकपीट क्र्यूमध्ये असणाऱ्या प्रत्येकालाच कोणतीही घोषणा केल्यानंतर 'जय हिंद' म्हणणं अनिवार्य आहे. असा आदेशच एअर इंडियाकडून देण्यात आला आहे. सोमवारी पत्रकातून त्यांनी याविषयीची अधिकृत माहिती दिली.
क्य्रू मेंबर्सनी प्रत्येक घोषणेनंतर प्रचंड उत्साहात आणि तितक्याच आत्मियतेने 'जय हिंद' बोलणं अपेक्षित असल्याचं या पत्रकात सांगण्यात आलं आहे. विमान प्रवासादरम्यान कोणतीही घोषणा केल्यानंतर काही सेकंदांच्या विरामानंतर आता 'जह हिंद'चीही घोषणा होणार आहे. २०१६ मध्ये एअर इंडियाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अश्वनी लोहानी यांनी त्यांच्या कार्यकाळात अशाच प्रकारचे आदेश दिले होते. ज्यानंतर आता पुन्हा असेच आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात एअर इंडियाच्या विमान प्रवासादरम्यानही देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसेल यात शंका नाही.
विविध ठिकाणांना जोडत प्रवाशांना विमान सेवा पुरवणाऱ्या एअर इंडियामध्ये सध्याच्या घडीला ३ हजार ५०० केबीन क्य्रू आणि जवळपास १ हजार दोनशे कॉकपीट क्र्यू कार्यरत असल्याची माहिती एएनआयने प्रसिद्ध केली आहे. मुख्य म्हणजे लोहानी पुन्हा एकदा एअर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाशी जोडले गेल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थान आता एअर इंडियाच्या प्रत्येक विमान प्रवासादरम्यान 'जय हिंद' म्हणत देशभक्तीचे सूर गुंजणार असं म्हणायला हरकत नाही.