Ajab Gajab : सर्पदंशाच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याचंही आपण ऐकलं असेल. पण उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. इथल्या एका तरुणाला महिन्याभरात तब्बल पाच वेळा साप चावला.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे साप चावल्यानंतर तरुणावर उपचार केले जातात आणि यातून तो बराही होतो. तरुणावर उपचार करणारे डॉक्टरही या गोष्टीमुळे हैराण झाले आहेत. विषारी साप चावल्यानंतरही तरुण सारखा बरा कसा होतो, याचं कोड डॉक्टरांनाही उलगडलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सापाच्या भीतीने घर सोडलं
सापाच्या भीतीने या तरुणाने राहातं घर सोडलं आणि आपल्या मावशीच्या घरी तो राहाण्यासाठी गेला. पण सापाने त्याची तिथेही पाठ सोडली नाही. ज्या घरात तरुण राहात होता, तिथे जाऊन साप त्या तरुणाला चावला. सर्पदंशाच्या सततच्या प्रकारामुळे तरुणाबरोबरच त्याचं कुटुंबही दहशतीत आहे. 


ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर जिल्ह्यातील मलवा इथल्या सौरा गावची आहे. सौराव गावात 24 वर्षांचा विकास दुबे हा तरुण राहातो. गेल्या महिन्याभरात विकासला तब्बल 5 वेळा साप चावला आहे. साप चावल्यानंतर घरचे त्याला रुग्णालयात दाखल करतात, आणि प्रत्येकवेळी उपचारानंतर तो ठिक होतो. आताही एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत दोन दिवसांपूर्वीच सापाने त्याला दंश केला होता.


कधी सुरुवात झाली घटनेला?
दोन जूनला रात्री 9 वाजता विकास बेडवरुन खाली उतरताच त्याला सापाने पहिल्यांदा दंश केला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबियांना त्याला एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले. इथे दोन दिवसांच्या उपचारानंतर तो बरा झाला आणि त्याला घरी पाठवण्यात आलं. पण 10 जूनला त्याला सापाने पुन्हा दंश केला कुटुंबियांना त्याला तात्काळ रुग्णालयात आणलं. उपचारानंतर विकास पुन्हा बराही झाला. दोन वेळा सर्पदंश झाल्याने विकास आणि त्याच्या कुटुंबियांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली. 


पण सात दिवसांनीच म्हणजे 17 जूनला घरात असताच विकासला तिसऱ्यांदा सापाने दंश केला. यावेळी विकासची तब्येत खूपच बिघडली, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु केले आणि तीन दिवसांच्या उपचारानंतर विकासची तब्येत सुधारली. पण आश्चर्य म्हणजे घरी आल्यानंतर चौथ्याच दिवशी विकासला सापाने चौथ्यांदा दंश केला. रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरही हैराण झाले. यावेळी देखील उपचारानंतर तो बरा झाला. 


वारंवार होत असलेल्या या घटनेमुळे डॉक्टर आणि नातेवाईकांनी त्याला दुसरीकडे जाऊन राहाण्याचा सल्ला दिला. यामुळे विकास सौर गावापासून दूर असलेल्या राधानगर इथे आपल्या मावशीच्या गावी राहाण्यास गेला. पण 28 जूनला म्हणजे गेल्या शुक्रवारी रात्री जवळपास बारा वाजता सापाने त्याला पुन्हा दंश केला. पुन्हा विकासला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 


एकाच महिन्यात पाचवेळा सापाने दंश केल्याचं वृत्त संपूर्ण देशात आता चर्चेचा विषय ठरलाय. नेमकं असं काय घडलंय की साप विकासलाच चावतो. यावरुन तर्क-वितर्क सुरु झाले आहेत.