BBC Documentary Row : ए के अँटनी यांच्या मुलाचा काँग्रेसला रामराम, म्हणाले `चमच्यांसोबत...`
BBC Documentary on Modi : अनिल अँटनी यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे की, कालच्या घटनांचा विचार करता माझ्यासाठी काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग करणं योग्य आहे. मी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो.
BBC Documentary Row : केरळचे माजी मुख्यमंत्री ए के अँटनी (AK Antony) यांचे चिरंजीव अनिल अँटनी (Anil Antony) यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. अनिल अँटनी यांनी आपण काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटाला (BBC Documentary on Gujarat Riots) विरोध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिल अँटनी यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. कालच्या घटनांचा विचार करता माझ्यासाठी काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग करणं योग्य असल्याच ते म्हणाले आहेत.
अनिल अँटनी यांनी ट्विटमध्ये आपण काँग्रेस आणि केरळ काँग्रेसमधून सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांकडून एक ट्विट मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला, पण आपण नकार दिल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अनिल अँटनी यांनी ट्वीटमध्ये राजीनामापत्रही जोडलं आहे.
अनिल यांनी काँग्रेस नेते शशी थरुर यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. आपल्या राजीनाम्यात त्यांनी म्हटलं आहे की "मला खात्री आहे की, माझ्याकडे काही वेगळ्या क्षमता आहेत ज्यांच्या आधारे मी पक्षाला सक्षम करण्यासाठी मदत करु शकलो असतो. पण मला हे जाणवून देण्यात आलं आहे की तुमचे सहकाही आणि नेतृत्वाशेजारी असणारे लोक फक्त काही चमचांसोबत काम करण्यास इच्छुक आहेत. जे तुम्ही सांगणार त्याचप्रमाणे काम करणार आहे. योग्यतेसाठी हा एकमेव मापदंड ठेवण्यात आला आहे. दुर्दैवाने आपल्यात फार काही साम्य नाही".
बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तयार केलेल्या माहितीपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. 2002 गुजरात दंगलीवर आधारित या माहितीपटात नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. केंद्र सरकारने युट्यूब आणि ट्विटरला माहितीपटाशी संबंधित सर्व गोष्टी हटवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर विरोधक टीका करत असून केरळमध्ये मंगळवारी अनेक राजकीय संघटनांनी हा माहितीपट दाखवला. यावरुन भाजपाकडून मोठ्या प्रमाणात निदर्शनेदेखील झाली.
भाजपा विरोध करत असताना अनपेक्षितपणे अनिल अँटनी यांनी त्यांना समर्थन दिलं. अनिल अँटनी यांनी या माहितीपटावरुन नाराजी जाहीर केली. ब्रिटिश ब्रॉडकास्टरने भारतीय संस्थांसंबंधी मत व्यक्त केल्याने देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं होतं.
"भाजपशी मतभेद असले तरी, मला वाटतं की पूर्वग्रहांचा दीर्घ इतिहास असलेल्या देशाचं प्रायोजित चॅनेल बीबीसी आणि इराक युद्धामागील असलेल्या जॅक स्ट्रॉचे यांनी भारतीय संस्थांवर मत मांडणं एक धोकादायक आणि सार्वभौमत्वाला कमी करणारं आहे," असं त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं होतं.