अखिलेश यांना रोखल्यानंतर कार्यकर्त्यांकडून आंदोलन, पोलिसांचा लाठीमार
अखिलेश यादव यांना लखनऊ विमानतळावर पोलिसांनी रोखले. पोलिसांनी रोखल्याने त्याचे जोरदार पडसाद उत्तर प्रदेशात उमटले आहेत.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना अलाहाबाद विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठी जाताना लखनऊ विमानतळावर पोलिसांनी रोखले. पोलिसांनी रोखल्याने त्याचे जोरदार पडसाद उत्तर प्रदेशात उमटले आहेत. अनेक भागांत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन केले. यावेळी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे आंदोलक अधिक संतप्त झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर त्यांना रोखण्यात आल्याचे समाजवादीकडून सांगण्यात आले. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, असा आरोपही समाजवादीकडून करण्यात आला आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांच्या भेटीमुळे विद्यार्थी संघटनांत हिंसाचार होण्याची शक्यता होती. त्यामुळे अलाहाबाद विद्यापीठाने अखिलेश यादव यांचा दौरा थांबवण्याची विनंती सरकारकडे केली होती. त्यानुसार सरकारने कार्यवाही केली, अशी माहिती मुख्यमंत्री योगी यांनी दिली.
संतप्त आंदोलकांनी योगी आदित्यनाथ सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेचे पडसाद संसद अधिवेशन आणि उत्तर प्रदेश विधिमंडळ अधिवेशनात उमटले. यावेळी राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. आज सकाळी अलाहाबाद विद्यापीठात एका विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी जाण्यासाठी अखिलेश यादव हे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. मात्र, विमानतळ त्यांना रोखले. त्यामुळे समाजवादीचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेत.
अखिलेश यांना विमानतळावर रोखल्याचे समजताच समाजवादी पक्षाच्या आमदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुद्दा उपस्थित केला. सध्याच्या भाजप सरकारकडून लोकशाहीची हत्या केली जात असून, आमच्या नेत्यांना अलाहाबादला जाण्यापासून रोखण्यात आले, असे समाजवादी पक्षाचे नेते नरेंद्र वर्मा म्हणाले. या वेळी समाजवादी पक्षाचे आमदार वेलमध्ये येऊन घोषणा देऊ लागले. त्यानंतर अध्यक्षांनी वीस मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर, सभागृहाचे कामकाज सुरू होताच समाजवादी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्येच धरणे आंदोलन सुरू केले.
यावेळी सभागृहात योगी सरकारविरुद्ध समाजवादी पार्टीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. "योगी तेरी तानाशाही नहीं चलेगी' अशा घोषणा दिल्या. बसप नेते लालजी वर्मा यांनीही समाजवादी पक्षाच्या आंदोलनात सहभाग घेऊन आदित्यनाथ सरकारवर टीका केली.