Alcohol In Tetra Pack: तामिळनाडू सरकार लवकरच दारु टेट्रा पॅकमध्ये विकण्यासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार तामिळनाडूचे दारूबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्री एस. मुथुस्वामी यांनी यामागील कारण सांगितलं आहे. राज्य सरकार पर्यावरण आणि स्वच्छेतेच्या दृष्टीकोनातून टेट्रा पॅकमध्ये दारु विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार करत असल्याचं मुथुस्वामी यांनी सांगितलं. राज्य सरकारने 500 दारुविक्री करणारी दुकानं कायमची बंद करण्याची घोषणा केली आहे.


टेट्रा पॅकमधून दारु विकली तर पर्यावरणाला फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बाटल्या कधी कधी फुटतात आणि त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळेच टेट्रा पॅकमधून दारुविक्री सुरु केली तर ही समस्या दूर करता येईल," असंही मुथुस्वामी यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करताना म्हटलं. त्याचप्रमाणे दारुचं सेवन केल्यानंतर रस्त्यांच्याकडेला किंवा शेतांमध्ये टाकलेल्या बाटल्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते, असा युक्तीवादही सरकारकडून करण्यात आला आहे.


सर्वांनाच फायदा होण्याचा दावा


दारु टेट्रा पॅकमध्ये विकल्यास काय फायदे होतील याबद्दलही मंत्र्यांनी माहिती दिली. तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये तसेच पुद्दूचेरीमध्ये पूर्वीपासूनच दारु टेट्रा पॅकमध्ये विकली जात असल्याचंही मुथुस्वामींनी अधोरेखित केलं आहे. दारु टेट्रा पॅकमध्ये विकण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुथुस्वामी यांनी दारुच्या बाटल्यामुळे होणाऱ्या नुकसानाबरोबरच टेट्रा पॅकमधून दारु विकल्यास कंपन्या, विक्रेते आणि ग्राहकांनाही कसा फायदा होणार आहे याबद्दलची माहिती दिली आहे. टेट्रा पॅकमधून दारु विक्री केल्यास त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता फारच कमी असते असंही मुथुस्वामींनी सांगितलं. तसेच ट्रेटा पॅक हे हातळण्यासही सोपे असल्याचं म्हटलं आहे.


विरोधाला सुरुवात


दारु टेट्रा पॅकमधून विकण्यास परवानगी देण्यासंदर्भात सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु आहे. या व्यवस्थेचं मूल्यांकन केल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. तसेच 500 दारुची दुकानं बंद केल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना इतर दुकानांमध्ये नियुक्त केलं जाईल असंही मुथुस्वामी म्हणाले. मात्र दारु टेट्रा पॅकमधून विकण्याच्या प्रस्तावाला आतापासूनच विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. पीएमकेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अंबुमणी रामदॉस यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. "अल्पवयीन मुलं आणि विद्यार्थी दारुचे टेट्रा पॅक हे इतर पेय असल्याचं समजून त्यांचं सेवन करु शकतात," असं रामदॉस यांचं म्हणणं आहे.