लष्कराचा ताफा तपासाविना बाहेर सोडू नका, गुप्तहेर यंत्रणांनी दिला होता इशारा
विना तपास जवानांचा ताफा सोडू नका, असे गुप्तहेर खात्याने आपल्या अहवालात म्हटले होते.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये 1989 सालानंतरच्या सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यात भारताचे 44 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षेत झालेल्या चूकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इतक्या मोठ्या ताफ्यात जवानांनी जायलाच नको होते असे जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले. सीआरपीएफच्या या ताफ्यात 2500 हून जास्त जवान होते. एवढंच नव्हे तर गुप्तहेर खात्याने यासंदर्भातील इशारा देखील दिला होता. विना तपास जवानांचा ताफा सोडू नका, असे गुप्तहेर खात्याने आपल्या अहवालात म्हटले होते.
गुप्तचर विभागाने 8 फेब्रुवारीला आईडी हल्ल्यासंदर्भातील अलर्ट जारी केला होता. लष्कराचा ताफा जात असलेला विभाग तपासल्या शिवाय पुढे जाऊ नये असा स्पष्ट इशारा यामध्ये देण्यात आला होता. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या इशाऱ्यात 9 फेब्रुवारीला सर्वात जास्त धोका असल्याचे म्हटले होते. पहाटे किंवा रात्रीच्या वेळी हा हल्ला होऊ शकतो असा इशारा देण्यात आला होता. 14 फेब्रुवारीला गुरुवारी सीआरपीएफचे जवान 70 हून अधिक वाहनांतून जम्मू येथून श्रीनगरला निघाले होते. तेव्हाच हा दहशतवादी हल्ला झाला.
गुप्तहेर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे लक्ष दिले असते तर या दहशतवादी हल्ल्यातून झालेले न भरून येणारे नुकसान टाळता आले असते. हा हल्ला घडवून आणणाऱ्या अहमद डारने श्रीनगर-जम्मू राजमार्गावर आपली विस्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सीआरपीएफच्या बसवर ठोकली. यातून मोठा स्फोट झाला आणि 44 जवान शहीद झाले तर अनेकजण जखमी झाले. पाकिस्तानात असलेल्या जैश-ए-महम्मद ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दहशतवादी संघटनेने आत्मघातकी हल्ला करणाऱ्याचा व्हिडीओ जारी केला आहे जो त्याने हल्ला करण्याआधी शूट केला होता. हा हल्ला श्रीनगरपासून 30 कि.मी असलेल्या लेथपोरामध्ये झाला. दहशतवादी संघटनेचा एक कमांडर आदिल अहमद दार हा आत्मघाती हल्लेखोर होता असे संघटनेने सांगितले.
जैश ए मोहम्मदच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या बसला स्फोटकांनी भरलेल्या स्वत:च्या गाडीने ठोकर दिली. सीआरपीएफच्या जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता. यात दोन हजारांहून अधिक जवानांचा समावेश होता. या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. आयईडी स्फोटानंतर गोळीबाराचेही आवाज येत होते. जखमींना तत्काळ श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते. गेल्या काही वर्षातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला ठरला आहे.