कोरोनामुळे विमान कंपन्या अडचणीत, ‘इंडिगो’कडून पगारात कपात
जगभरातल्या विमान कंपन्या अडचणीत सापडल्या असून काही दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा जगभरात फैलाव झाल्यानंतर सर्वच क्षेत्रांना त्याचा फटका बसला आहे. पण कोरोनाचा सर्वात मोठा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. जगभरातल्या विमान कंपन्या अडचणीत सापडल्या असून काही दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. आधीच अडचणीत असलेल्या भारतातील विमान कंपन्यांही कोरोनामुळे आणखीच अडचणीत आल्या असून इंडिगो कंपनीनं अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचं ठरवलं आहे.
इंडिगोचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी कर्मचारी आणि व्यवस्थापनाला पत्र लिहून पगारकपातीची माहिती दिली आहे. १ एप्रिल २०२० पासून पुढच्या वर्षासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात येणार असल्याचं त्यांनी कळवलं आहे. सीईओ दत्ता यांनी स्वतःच्या पगारात २५ टक्के कपात केली असून ए आणि बी वर्ग कर्मचारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात सूचवली आहे. कंपनीचे सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट आणि त्यावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात २० टक्के कपात करण्यात येणार आहे. तर व्हाईस प्रेसिडेंट आणि कॉकपिट कर्मचाऱ्यांच्या पगारात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. याशिवाय असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, डी श्रेणीचे कर्मचारी आणि केबिन क्रूच्या पगारात १० टक्के कपात करण्यात येणार आहे. सी श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ टक्के कपात करण्यात येणार आहे.
पगार कपातीचा निर्णय आपल्यासाठी कठीण असला तरी दुर्दैवानं एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपणा सर्वांना काहीतरी त्याग करण्याशिवाय गत्यंतर नाही, असा संदेश इंडिगोच्या सीईओंनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
हवाई वाहतूक क्षेत्रासाठी सरकारचं १० हजार कोटींचं पॅकेज?
कोरोना व्हायरसमुळे अडचणीत सापडलेल्या हवाई वाहतूक क्षेत्राला सरकार १० हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. हवाई वाहतूक क्षेत्रासाठी मदतीच्या पॅकेजची रुपरेषा ठरवली जात असून ती अंतिम टप्प्यात असल्याचं कळतं. सूत्रांच्या माहितीनुसार, हवाई क्षेत्राला लागू असलेले कर ठराविक काळासाठी रद्द केले जाऊ शकतात. तसेच विमानांच्या इंधनावर लागणारा करही काही कालावधीसाठी रद्द केला जाऊ शकतो.
कोरोना व्हायरसमुळे विमान कंपन्यांच्या तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तिकीट विक्रीत ३० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली असून यापुढच्या काळात घट आणखी वाढण्याची शक्यता आहे. विस्तारा आणि गो एअर एअरलाईन्स या कंपन्यांनी त्यांची आंतरराष्ट्रीय वाहतूक थांबवली आहे. तर देशांतर्गत वाहतूक करणाऱ्या इंडिगो, स्पाईस जेटसारख्या एअरलाईन्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात आसनं रिकामी राहत असल्यानं उड्डानांची संख्या कमी केली आहे.