सर्व सिनेमा हॉल आणि शाळा ३१ मार्चपर्यंत बंद, मुख्यमंत्री केजरीवालांची घोषणा
दिल्लीतील सर्व सिनेमागृह आणि शाळा ३१ मार्चपर्यंत बंद
नवी दिल्ली : चीनपासून सुरु झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरला झालाय. भारतात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभुमीवर दिल्ली सरकराने महत्वाचा निर्णय घेतलाय. दिल्लीतील सर्व सिनेमागृह आणि शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. या दरम्यान शाळा आणि कॉलेजमध्ये कोणत्याही परीक्षा होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक साथ
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरसला जागतिक साथ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जगातील ११४ देशांमधील १ लाख १८ हजार लोकांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार २९१ लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळं बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर पॅन्डेमिक अर्थात 'जागतिक साथीचा रोग' म्हणून कोरोना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी ही घोषणा केली आहे.
पर्यटकांना बंदी
या पार्श्वभूमीवर भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हीसांना सरकारने स्थगिती दिली आहे. यातून केवळ डिप्लोमॅटीक व्हीसा, युएन व्हिसा आणि इतर ऑफिशिअल व्हिसांना वगळण्यात आले आहेत. परदेशी नागरिकांना भारतात १५ एप्रिलपर्यंत प्रवेशबंदी देण्यात आली असून अद्याप आयपीएलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
शेअर बाजारावर परिणाम
कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाचा परिणाम आज शेअर बाजारावरही पाहायला मिळाला. भारत सरकारने खबरदारीची पाऊले उचलत परदेशातून येणारे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सकाळपासूनच मोठी घसरण पाहायला मिळाली. इतक्या मोठ्या घसरणीनंतर खुला बाजार सावरु शकला नाही. जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) कोरोना वायरसला गंभीर आजार घोषित केल्यानंतर सेंसेक्स आणि निफ्टी उभे राहु शकले नाही. परदेशी बाजारातून मिळालेल्या निराशाजनक संकेतांच्या दबावामुळे सेंसेक्स २,९१९ अंकानपासून ३२,७७८ वर बंद झाला. तर निफ्टी ८६८ अंकानी घसरुन ९,५९० वर बंद झाला. २००८ नंतरची आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे जाणकार सांगतात.