एकाच चार्जरनं चार्ज होणार सर्व Device? प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन
सिंगल चार्जर प्रस्ताव युरोपमध्ये पास झाल्यानंतर भारतातही त्या दृष्टीकोनातून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.
Single Charger for multiple Device: तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्हाला कधी ना कधी चार्जरची समस्या भेडसावली असेलच. त्याचबरोबर आपल्याकडे पाच वेगवेगळे डिव्हाइस असतील, तर सांगायलाच नको. अनेकदा घराबाहेर पडल्यानंतर आपल्या मोबाईलचा चार्जर दुसऱ्याकडे नसतो. त्यामुळे चार्जरसाठी इकडे तिकडे भटकावं लागतं. त्यामुळे कधी कधी असं वाटतं, सगळ्या डिव्हाइससाठी एकच चार्जर असता तर किती बरं झालं असतं. नागरिकांची समस्या पाहता युरोपियन युनियन देशांनी याबाबतचा प्रस्ताव देखील मंजूर केला आहे. त्यामुळे आयफोनसह सर्व कंपन्यांना सी टाईप चार्जर द्यावा लागणार आहे. युरोपमध्ये हा प्रस्ताव पास झाल्यानंतर भारतातही त्या दृष्टीकोनातून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने मोबाईल कंपन्यांना पत्र लिहून 17 ऑगस्टला बैठक बोलावली आहे.
या बैठकीत गॅजेट्सबाबत काही बाबी स्पष्ट केल्या जाणार आहेत. कॉमन चार्जरबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. इअरबड्स, हेडफोन्स, स्मार्टवॉच, हेल्थ गॅझेट्स, स्पीकर यासाठी वेगवेगळे चार्जर वापरावे लागते. यासाठी एकच म्हणजेच टाइप सी चार्जर असावं, असा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. यामुळे कंपनीची कॉस्ट सेव्हिंग होणार आहे. त्याचबरोबर ई-वेस्ट रोखण्यास मदत होईल. वारंवार चार्जर खरेदी करण्याची चिंताही दूर होईल.
युरोपमधील 27 देशांनी सिंगल चार्जर प्रस्तावाला मंजुरी दिली असून त्याचं कायद्यात रुपांतर झालं आहे. आता 2024 पर्यंत सर्व इलेक्ट्रिक उपकरणांसाठी एकच चार्जरचा वापर केला जाईल. या चार्जरला युनिवर्सल चार्जर नाव दिलं गेलं आहे. युरोपमध्ये दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची चार्जर खरेदी करतात.