नवी दिल्ली : समझौता एक्सप्रेस स्फोट प्रकरणात पंचकुला स्पेशल कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. समझौता एक्सप्रेस स्फोटात विशेष एनआयए कोर्टाने पाकिस्तानची महिला राहिला वकीलची याचिका रद्द केली आहे. कोर्टाने सर्व चारही आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समझौता एक्सप्रेस स्फोटात आपल्या वडिलांना गमवल्यानंतर पाकिस्तानी महिला राहिला वकीलने एनआईय कोर्टात याचिका दाखल केली होती. राहिला वकीलने भारतीय वकील मोमिन मलिकच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणात या महिलेने साक्ष देण्याची मागणी केली होती. १८ मार्चला झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजुच्या वकिलांनी आपली बाजू मांडली.


पाकिस्तानी महिला राहिला वकीलच्या याचिकेवर आज सुनावणी करताना कोर्टाने ही याचिका फेटाळली. कोर्टाच्या या निर्णयानंतर भाजपचे नेते राम माधव यांनी हे यूपीए सरकारच्या काळातील खोटं प्रकरण असल्याचं म्हंटलं आहे. 


काय होतं प्रकरण?


भारत-पाकिस्तान यांच्यात आठव़ड्यातून २ वेळा चालणारी समझौता एक्सप्रेसमध्ये १८ फेब्रुवारी २००७ ला हरियाणाच्या पानीपत जिल्ह्यातील चांदनी बाग येथे स्फोट झाला होता. या स्फोटात ६८ जणांचा मृत्यू झाला होता तर १२ जण जखमी झाले होते. दिल्ली येथून लाहौरला ही ट्रेन जात होती. यामध्ये अनेक पाकिस्तानी नागरिक मारले गेले होते.