मुंबई : सध्या संपूर्ण भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी लसीशिवाय कोणताही पर्याय नाही. सध्या भारतात जितक्या लसी आहेत, त्या इंजेक्शनद्वारे दिल्या जात आहेत. मात्र लवकरच बाजारात नेजल वॅक्सीनही  (Nasal Vaccine) उपलब्ध होणार आहेत. यासाठी दिल्लीतील एम्समध्ये अधिकृतरित्या चाचणी सुरु आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार या लसीला तत्व: परवानगी (Nasal Spray Vaccine) देण्यात आली आहे. आता फक्त आचार समितीच्या अंतिम निर्णायकडे लक्ष लागून राहिलं आहे. (All India Institute of Medical Sciences to begin phase 2 trials of corona nasal vaccine)    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्समध्ये तयारी


एम्समध्ये या सर्व लसीकरण कार्यक्रमाची जबाबदारी ही डॉक्टर संजय राय यांच्या खांद्यावर आहे. राय यांच्यानुसार "लवकरच या लसीची चाचणी सुरु केली जाणार आहे. या चाचणीसाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली जात आहे. मात्र या चाचणीला केव्हापासून सुरुवात केली जाणार, हे सांगणं धाडसी ठरेल. या सर्व प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात मदत लागेल. त्यासाठी आम्ही स्वयंसेवक तयार करतोय, अशी माहिती डॉक्टर राय यांनी दिली. 


ही लस कशी दिली जाणार?  


नेजल वॅक्सीन ही नाकावाटे देण्यात येणार आहे. या लसीचे केवळ 4 थेंब दिले जातील. पहिल्यांदा 2 थेंब दिले जातील. त्यानंतर 2 मिनिटांच्या अंतराने 2 थेंब दिले जातील. 


नाकावरुन मास्क हटणार? 


या लसीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण होणार नाही. काही तज्ज्ञांनुसार, नेजल वॅक्सीनमुळे मास्कपासून मुक्ती मिळू शकते. ही लस घेतल्यानंतर कोरोनाचे विषाणू शरीरातून नाकावाटे बाहेरही येऊ शकत नाही. तसेच शरीरातही जाऊ शकणार नाही. त्याचा फायदा असा की, ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षण असतील, ती व्यक्ती खोकल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला धोका संभवणार नाही.


ही लस कोणाला मिळणार?


सध्या भारत बायोटेकने देशात नेजल लसीबाबत बरीच प्रगती केली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. अशात ज्यांनी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला तसेच दुसरा डोस घेतला आहे, अशांना ही नेजल व्हॅक्सीन दिली जाईल.   


मुलांसाठी वरदान


इंजेक्शनद्वारे लस घेण्यासाठी अजूनही काही जणं घाबरतात. अशांसाठी ही नेजल वॅक्सीन वरदान ठरणार आहे. सोबतच वॅक्सीनवर होणारा खर्चही कमी होईल आणि वाहतुकखर्च कमी होईल. तसेच प्लस पोलिआप्रमाणे दारोदारी जाऊन लसीकरण करता येईल.