`सगळे एक्झिट पोल खोटे ठरतील; दिल्लीत भाजपचीच सत्ता येईल`
भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल.
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या सर्व मतदानोत्तर चाचण्यांचे (EXIT POLL)निष्कर्ष खोटे ठरतील, असा दावा दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय रणधुमाळीमुळे घुसळून निघालेल्या दिल्लीत शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान पक्रिया पार पडली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिल्लीत तब्बल ५५ टक्के मतदानाची नोंद झाली.
यानंतर विविध वृत्तसंस्था आणि सर्वेक्षण संस्थांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (आप) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी 'आप'ला ४५ ते ५५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. तर गेल्यावेळी अवघ्या तीन जागांवर विजय मिळालेला भाजप २६ जागांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज आहे. तर काँग्रेसला अवघ्या एक किंवा दोन जागा मिळतील, असे निरीक्षण आहे.
Delhi Exit Poll: केजरीवाल दिल्ली राखणार; भाजपचा आक्रमक प्रचार फोल
मात्र, मनोज तिवारी यांचे एक्झिट पोल्सचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. काही एक्झिट पोल्स भाजप २६ जागा जिंकेल, असे दाखवत आहेत. मात्र, ११ फेब्रुवारीला हे सर्व एक्झिट पोल्स खोटे ठरतील. भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल, असा दावा मनोज तिवारी यांनी केला आहे.
तर पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांनीही भाजपला जवळपास ५० जागा मिळतील, असे म्हटले आहे. त्यामुळे भाजपचे नेते कोणत्या बळावर छातीठोकपणे अशाप्रकारचे दावे करत आहेत, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही वेळापूर्वीच ईव्हीएम यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी 'आप'च्या नेत्यांची बैठक बोलावली होती. तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिल्ली भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली.
२०१५ च्या तुलनेत दिल्ली विधानसभा निवडणुकीत यंदा जवळपास १२ टक्के कमी मतदान झाले आहे. त्यामुळे आता येत्या ११ तारखेला जाहीर होणारे निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.