रुग्णालयात पेशंटची फी म्हणून रोख रक्कम देण्याची मर्यादा आयकर विभागाने वाढवली, कारण...
कोव्हिड उपचारासाठी अनेक रूग्णालय आणि नर्सिंग होम रूग्णांकडून रोख पैसे देण्याची मागणी करत आहेत.
मुंबई : इनकम टॅक्स डिपार्टमेंटने (Income Tax Department) असे म्हंटले आहे की, रूग्णालये, दावाखाना आणि कोव्हिड केअर सेंटरमध्ये रूग्ण किंवा त्यांच्या कुटूंबियांकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारण्याची परवानगी देण्याचा हा निर्णय, साथीच्या काळात पीडित लोकांसाठी एक चांगला निर्णय आहे. कोव्हिड उपचारासाठी अनेक रूग्णालय आणि नर्सिंग होम रूग्णांकडून रोख पैसे देण्याची मागणी करत आहेत. कोरोना साथीची सध्याची परिस्थिती लक्षात घेता, लोकांचे प्राण वाचविणे हे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे आणि लोकांना सूट दिली आहे.
पॅन किंवा आधार द्यावा लागेल
इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ट्वीटरवर लिहिले की, CBDT ने साथीच्या काळात रुग्णांसाठी गोष्टी सुलभ केल्या आहेत. इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 269ST च्या तरतुदीस सूट देताना रुग्णालयांना कोविडच्या उपचारासाठी 2 लाख रुपयांहून अधिक रक्कम घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
परंतु यासाठी त्यांनी ही रक्कम भरणाऱ्याचा किंवा रुग्णांचा पॅन किंवा आधार नंबर घ्यावा, या अटीवर ही सूट देण्यात आली आहे.
31 मे पर्यंत 2 लाख रोख रक्कम भरणे शक्य
गेल्या आठवड्यात सीबीडीटीने रुग्णालये, दवाखाने आणि कोव्हिड केअर सेंटरना रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून 31 मेपर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारण्याची परवानगी दिली आहे.
परंतु त्यासाठी रुग्णाचा आधार किंवा पैसे भरणाऱ्या व्यक्तिचा पॅन किंवा आधार कार्ड घेणे आवश्यक आहे असे सांगितले आहे. तसेच पैसे भरणारा आणि रुग्ण त्यांच्यातील नात्याविषयी माहिती देखील घेतली जाणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.