मुंबई : Jammu Kashmir मधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या ढगफुटीमुळं यात्रा तात्काळ थांबवण्यात आली. पुढील आदेश येईपर्यंत यात्रा थांबवण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळं या भागात एकच हाहाकार माजल्याचंही पाहायला मिळालं. जीवन- मृत्यूची झुंज यावेळी संपूर्ण देशानं पाहिली. (Amarnath Cloudburst photos people in search of their own)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढगफुटीनंतर या परिसरात एकच कोलाहल माजला. काय झालं हे कोणालाच कळेना. पाण्याचे आणि चिखलाचे लोट आले आणि सोबत वाटेत येणारं सर्वकाही घेऊन गेले. भीतीपोटी तंबूंमध्ये असणारे भाविकही आक्रोश करत बाहेर आले आणि नियतीनं त्यांच्यावरही घाला घातला. 


सदर घटनेनंतर लष्कर, ITBP, CRPF, NDRF आणि SDRF च्या तुकड्यांनी इथं बचावकार्य सुरु केलं आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाला हे संकट किती मोठं होतं याची प्रचिती येत गेली. 40 हून अधिकजण बेपत्ता असल्याचे प्राथमिक आकडे समोर आले. 


आतापर्यंत या ढगफुटीमध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला. जिथं जखमींना एअरलिफ्ट करत सुरक्षित स्थळी नेत त्यांच्यावर उपचार करण्याचं काम सुरु होतं, तिथेच कैक मृतदेहसुद्धा ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरु होतं. 



आपलं माणूस सुखरुप आहे ना, त्या ढिगाखाली कुणी आपलं नाही ना अशीच भीत तिथं ढगफुटीच्या कचाट्यात सापडलेल्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी हतबलता पाहणाऱ्य़ांचाही आत्मविश्वास मोडणारी होती, हे संकट नेमकं किती गंभीर आहे आणि निसर्ग किती क्रूर आहे, याची प्रचिती देणारी होती. 



देवाच्या दारी आल्यानंतर, का रे इतका निष्ठुर झालास... कुठे कमी पडली आमची भक्ती... असे केविलवाणे प्रश्न ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं त्यांनी विचारण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत पाऊस तर थांबला, पण तिथे असणाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबले नव्हते.