श्रीनगर : दोन दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ आलेल्या पुरामुळे 16 जणांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक बेपत्ता झाले होते. या घटनेनंतर अमरनाथ यात्रा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. या भागात रविवारी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर 40 बेपत्ता लोकांच्या शोधासाठी लष्कराकडून मोहीम राबवली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, पवित्र अमरनाथ गुंफा परिसर, बालटाल आणि पंजतरणीसह इतर ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी अमरनाथ यात्रा आधीच पुढे ढकलण्यात आली होती. याशिवाय ढगफुटीच्या घटनेनंतर बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे.


15 हजार यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आले


ढगफुटीच्या घटनेतील जखमींची संख्या 105 वर गेली आहे. 40 बेपत्ता लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी लष्कराने 4 MI 17 हेलिकॉप्टर आणि 4 चेतक हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचे जवान सतत त्यांचा शोध घेत आहेत. डीजी एनडीआरएफ यांनीही रविवारी परिसराला भेट दिली. येथे विविध ठिकाणी अडकलेल्या 15000 हजारो यात्रेकरूंना बाहेर काढून सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.


बचावकार्य संपेपर्यंत अमरनाथ यात्रा स्थगित


शनिवारी संध्याकाळी एलजी मनोज सिन्हा यांनी राजभवन, श्रीनगर येथे अमरनाथ यात्रेत सहभागी असलेल्या विविध एजन्सींसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. ज्यामध्ये बचाव कार्य पूर्ण होईपर्यंत यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. जम्मू आणि काश्मीर एलजी मनोज सिन्हा श्री अमरनाथ श्राइन बोर्डचे अध्यक्ष आहेत. लवकरच पुन्हा यात्रा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


जम्मू-काश्मीरमध्ये रविवारपासून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास अमरनाथच्या आजूबाजूला पाणी साचते. सध्या सर्व जखमी यात्रेकरूंवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.