#CAA:ईशान्य भारतात आंदोलनाची धग कायम; `खेलो इंडिया`च्या उद्घाटनाला मोदींची अनुपस्थिती
यापूर्वी गुवाहाटीतील इंडिया-जपान परिषदही रद्द करावी लागली होती.
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) ईशान्य भारतात सुरु असलेल्या आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटीतील 'खेलो इंडियाच्या' उद्घाटन समारंभाला जाण्याचा बेत रद्द करण्याची निर्णय घेतला. येत्या १० तारखेला गुवाहाटीत 'खेलो इंडिया'चा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले होते. मात्र, आम्हाला पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु, पंतप्रधान मोदी कार्यक्रमाला येणार नसल्याची बाब अनौपचारिकपणे आम्हाला कळवण्यात आल्याची माहिती 'खेलो इंडिया'चे सीईओ अविनाश जोशी यांनी दिली.
'भारतीय नागरिकांच्या मुलांना डिटेन्शन सेंटरला धाडलं जाणार नाही'
नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आसामसह संपूर्ण ईशान्य भारतात आंदोलनाचा भडका उडाला होता. अनेक दिवस उलटूनही या आंदोलनाची धग किंचितही कमी झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'खेलो इंडियाच्या' उद्घाटन समारंभाला येणार असल्याचे कळाल्यानंतर ऑल आसाम युनियनने ( AASU)मोठ्याप्रमाणावर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता.
सीएएचं समर्थन केल्याने बसपा आमदाराला मायावतींनी केलं निलंबित
यापूर्वी १५ ते १७ डिसेंबर या कालावाधीत गुवाहाटीमध्ये इंडिया-जपान परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र, CAA विरोधी आंदोलन तापल्यानंतर जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी गुवाहाटीत येण्याचा बेत रद्द केला होता. या आंदोलनादरम्यान गेल्या महिन्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. तर अन्य दोघे हिंसक कारवायांमध्ये ठार झाले होते.
भारतात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी २०१८ पासून 'खेलो इंडिया'चे आयोजन करण्यात येत आहे. यंदा 'खेलो इंडिया'चे तिसरे पर्व असून १० जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल.