JP Nadda: जे पी नड्डा भाजपाध्यपदी कायम राहणार, राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठा निर्णय
JP Nadda Tenure Extended : भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ एका वर्षांनी वाढवला, अमित शाह यांची घोषणा
BJP Executive Meet 2023 : भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ (JP Nadda Tenure Extended) वाढवण्यात आला आहे. जे पी नड्डा यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवण्यात आला आहे. यामुळे २०२४ मधील लोकसभा निवडणूक भाजपा जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं स्पष्ट आहे. दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी जे पी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्याचा प्रस्ताव मांडला, यानंतर अमित शाह यांनी अधिकृत घोषणा केली.
जून २०२४ पर्यंत जे पी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली आहे. "जे पी नड्डा यांच्या कार्यकाळात बिहारमध्ये आमचा स्ट्राइक रेट चांगला होता. एनडीएने महाराष्ट्रात बहुमत मिळवलं, उत्तर प्रदेशात विजय मिळवला आणि पश्चिम बंगालमधील सदस्यांची संख्या वाढली," असं अमित शाह म्हणाले.
"पश्चिम बंगालमध्ये भाजपाने चांगली कामगिरी केली. उत्तर प्रदेश, गोवा, गुजरातमध्ये पक्षाच्या बाजूने निकाल लागला. नॉर्थ ईस्टमध्ये पक्ष संघटना मजबूत झाली. तेलंगणातही पक्ष मजबूत झाला," असं अमित शाह यांनी सांगितलं. नड्डांच्या काळात नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असा विश्वासही अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
सध्याचं वर्ष सदस्यत्व अभियानाचं असून करोनामुळे दोन वर्ष हे अभियान राबवता आलं नव्हतं. सहा वर्षांनी पहिल्यांदाच पक्ष सदस्यत्व वाढवण्यासाठी काम केलं जाणार आहे अशी माहिती अमित शाह यांनी यावेळी दिली.
तसंच आगामी निवडणुकांबद्दल बोलताना अमित शाह यांनी "नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात आम्ही 2024 मध्ये 2019 पेक्षाही जास्त जागा जिंकू" असा विश्वास व्यक्त केला.