नवी दिल्ली : अमित शाह यांचा मोदी सरकारमध्ये समावेश झाल्यामुळे आता भाजपाचा नवा अध्यक्ष कोण? याची उत्सुकता आहे. भाजपामध्ये एक व्यक्ती एकच पद भूषवू शकतो असा नियम आहे. त्यानुसार आता अमित शाहांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे त्यांना पक्षाचं अध्यक्षपद सोडावं लागणार आहे. नव्या अध्यक्षांसाठी जे पी नड्डा आणि भूपेंद्र यादव यांची नावं चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळल्यानं नड्डा यांना मोदी आणि शाह यांची पसंती मानली जाते. तर बिहारमध्ये भूपेंद्र यादव यांचं संघटनात्मक कामानं पक्षाला मोठा फायदा झालाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान, गुरुवारी सायंकाळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनाच्या आवारात देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याला जगभरातून दिग्गजांनी उपस्थिती लावली. देशातल्या दिग्गज राजकारण्यांसह बडे उद्योगपती आणि कलाकारांनीही या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावली. अनेक देशांच्या प्रमुखांनी या सोहळ्याला सपत्नीक उपस्थिती लावली. नरेंद्र मोदींनी शपथविधी घेण्यापूर्वी मंचावर उपस्थित असलेल्या नियोजित मंत्र्यांना अभिवादन केलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी मोदींना पंतप्रधानपदाची शपथ दिली. मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. मात्र, नितीन गडकरींच्या आधी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. २४ जणांनी कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली तर २४ जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे अमित शाह यांची अर्थमंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.